आंदोलनाची धग कायम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:49 AM2018-07-30T00:49:21+5:302018-07-30T00:49:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवडाभरापासून पेटलेला आंदोलनाचा वणवा आणखी तीव्र होत आहे. जाफराबादेतर सलग आठ दिवस हे आंदोलन सुरू आहे.रविवारी भोकरदन तालुक्यातील केदारखेडा तसेच अंबड येथे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. रविवारी रात्री अंबड येथे झुंझार छावाचे काही पदाधिकारी येथील पाण्याच्या टाकीवर चढले होते.
जाफराबाद : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यासाठी जाफराबाद तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथील तहसील कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. दिवसेंदिवस या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून एक मराठा लाख मराठा...आरक्षण हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून जात आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला दरम्यान कायगाव (जि.औरंगाबाद) येथील काकासाहेब शिंदे यांनी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागून तीव्र करण्यात आले. यावेळी मराठा बांधवांनी सरकारचा निषेध व्यक्त केला असून, जोपर्यत मराठा आरक्षणा संदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा देत बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. आंदोलन स्थळी भोजन घेऊन रात्रभर मुक्काम केला जात आहे.
केदारखेडा : येथील सकल मराठा समाजाच्या वतीने रवीवारी मुंडण आंदोलन करण्यात आले. सकाळी ८ वाजेपासुन सुरु झालेले मुंडण आंदोलन दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु होते. दरम्यान ३५० पेक्षा आधिक समाज बांधवांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. मराठा आरक्षणसह इतर मागण्यासाठी सकल मराठा समाज गेल्या सात दिवसापासून, विविध प्रकारे आंदोलन करीत आहे. याचाच एक भाग म्हणून केदारखेडा बसस्थानक वर सर्व समाज बांधवांनी एकत्र येत आंदोलन यशस्वी केले. विशेष म्हणजे या आंदोलनात सर्वच पक्षाच्या पदधिकाऱ्यानी राजकीय विचार बाजूला ठेवत या आंदोलनात सहभाग घेतला.
या आंदोलनात केदारखेडयासह वालसा, डावरगाव, वालसा खालसा, बोरगाव तारु, देऊळगाव ताड, चिंचोली, बानेगाव, तोडोंळी, गव्हाण संगमेश्वर, नळणी, बरंजळा साबळे, बरंजळा लोखंडे, बामखेडा, मेरखेडा आदी गावांच्या मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला. येथील नाभिक समाजाच्या १४ बांधवांनी पाठिंबा देत मोलाचे सहकार्य केले आहे.
राज्यमंत्री खोतकरांची आदोंलनास भेट
केदारखेडा येथे सुरु असलेले ग्रामिण भागातील मुंडण आदोंलन सुरु असताना या आदोंलनास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी भेट दिली. यावेळी शिवसेनेच्या वतीने मी सकल मराठा समाजाच्या पाठीशी असून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन सकल मराठा समाजाच्या आरक्षणा विषयीच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवू असे आश्वासन खोतकर यांनी यावेळी दिले.