लाठीमाराचे तीव्र पडसाद, संतप्त मराठा समाज उतरला रस्त्यावर; जालनामध्ये पुन्हा दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 06:32 AM2023-09-03T06:32:39+5:302023-09-03T06:32:50+5:30
दगडफेक झाल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच एअर पम्प ॲक्शन गनद्वारे हवेत दहा-पंधरा फैरी झाडल्या.
छत्रपती संभाजीनगर/ जालना /मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलकांवर शुक्रवारी रात्री झालेल्या पोलिस लाठीमाराचे तीव्र पडसाद शनिवारी संपूर्ण राज्यात उमटले. राज्यभरात ठिकठिकाणी दगडफेक, जाळपोळ, रास्ता रोको करण्यात आला. संतप्त जमावाने जालना शहरात ट्रकसह एका दुकानाला आग लावली. तहसीलदार व पोलिसांच्या वाहनावर दगडफेकदेखील करण्यात आली. दगडफेक झाल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच एअर पम्प ॲक्शन गनद्वारे हवेत दहा-पंधरा फैरी झाडल्या. अनेक नेत्यांनी अंतरवाली सराटी गावाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
जालनातील अंबड चौफुलीवर शनिवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह काही कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अंबादास दानवे, आमदार रोहित पवार यांनी अंतरवाली सराटी येथे भेट देऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला. या नेत्यांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. जखमी ग्रामस्थांशीही रुग्णालयात व गावात संवाद साधला. पोलिसांनी दगडफेक प्रकरणात ३६६ जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मराठा क्रांती मोर्चाचे आजपासून आंदोलन
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यानिमित्त रविवारी दादर येथे निदर्शने करण्यात येणार आहे.
एसटी सेवा ठप्प
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात अनेक ठिकाणी एसटी सेवा बंद ठेवण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी चौकशीचे निर्देश दिले आहेत.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून लाठीचार्ज केला आहे. ही अतिशय संतापजनक बाब आहे.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
दडपशाहीला बळी न पडता समाजबांधवांनी हे आंदोलन नेटाने सुरू ठेवले आहे. त्यांच्या पाठीशी मी सदैव उभा आहे.
- संभाजीराजे छत्रपती, मराठा नेते
गृहमंत्र्यांच्या आदेशाने लाठीचार्ज करण्यात आला. पोलिस तुमचे, आदेश तुमचे, राजकारण कोण करत आहे?
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
मराठा आंदोलकांनी आतापर्यंत कोणतेच चुकीचे पाऊल टाकलेले नाही. त्यामुळे इथे सरकारचेच चुकले हे निश्चित.
- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे