मोबाईल भेटल्याचा आनंद, सायबर पोलिसांनी चोरीस गेलेले २० मोबाइल शोधले
By दिपक ढोले | Published: June 2, 2023 05:41 PM2023-06-02T17:41:43+5:302023-06-02T17:44:14+5:30
पोलिसांनी जवळपास तीन लाख ९३ हजार ३६६ रुपयांचे २० मोबाइल शोधले आहेत.
जालना : हरवलेले किंवा चोरीस गेलेले जवळपास २० मोबाइल सायबर पोलिसांनी संचार साथी पोर्टलद्वारे शोधले आहेत. सर्व मोबाइल शुक्रवारी पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले. त्यामुळे तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले.
केंद्र सरकारने संचारसाथी पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे हरवलेले किंवा चोरीस गेलेल्या मोबाइलचा शोध घेतला जात आहे. त्यानुसार जालना सायबर विभागाने जिल्ह्यात चोरीस गेलेल्या किंवा हरवलेल्या मोबाइलची माहिती संबंधित तक्रारदारांकडून घेतली. संबंधित माहिती पोर्टलवर टाकून मोबाइल ट्रेस केले. संबंधित व्यक्तींना फोन करून पोलिसांनी जवळपास तीन लाख ९३ हजार ३६६ रुपयांचे २० मोबाइल शोधले आहेत. तक्रारदारांना शुक्रवारी पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्या हस्ते मोबाइल परत करण्यात आले.
यात गणेश पिसुले, कृष्णा घोटणकर, आकाश मोरे, वैभव म्हस्के, रुचिता मंगे, भीमराव मुंढे, आदर्श एखंडे, अझहर बेग नवाब बेग, किरणकुमार गायकवाड, लखन चित्ते, नीरज सिंघी, अर्जुन निकाळजे, दीक्षा भटकर, शरद भालेराव, परमेश्वर मदन, प्रफुल अंबेकर, वैष्णवी शेरकर यांना मोबाइल परत करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, सपोनि सुरेश कासुळे, सपोनि शिवाजी देशमुख, पोउपनि अंमलदार लक्ष्मीकांत आडेप, संदीप मांटे, किरण मोरे, सुनील पाटोळे, दिलीप गुसिंगे, गजानन मुरकुटे, संगीता चव्हाण यांनी केली आहे.
फसवणूक झालेल्या महिलेचे २५ हजार मिळाले परत
जालना येथील अरुणा रमेश फुलमामडीकर यांची ऑनलाइन ३३ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. त्यांनी याची माहिती सायबर पोलिसांना दिली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून संबंधित बँकेला पत्रव्यवहार केला. त्यानंतर फिर्यादीचे २५ हजार रुपये परत मिळाले आहेत.