भोकरदन तालुक्यात दमदार एन्ट्री: तासभर झालेल्या पावसाने पाणीच पाणी
By दिपक ढोले | Published: July 2, 2023 07:12 PM2023-07-02T19:12:57+5:302023-07-02T19:13:03+5:30
पावसाला सुरू होऊन २० ते २५ दिवस झाले; मात्र अद्यापही भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला नव्हता.
भोकरदन (जि.जालना) : भोकरदन तालुक्यातील काही भागांत रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तासभर झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले होते. या पावसामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रखडलेल्या पेरण्याला वेग आला आहे.
यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता; परंतु पावसाला सुरू होऊन २० ते २५ दिवस झाले; मात्र अद्यापही भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. शिवाय, अनेक शेतकऱ्यांच्या मिरचीचे पीक पाण्याअभावी सुकून जात होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले होते. अनेक शेतकऱ्यांनी तांब्याने मिरचीला पाणी देण्यास सुरुवात केली होती. त्यातच रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास भोकरदन, पेरजापूर, आव्हाना, गोकुळ, इब्राहिमपूर, आलापूर, फत्तेपूर, मासंनपूर, चोरहाळा, विरेगाव, कुंभारी, कोदोली, टाकळी, सिपोरा बाजार, नांजा, क्षीरसागर, सुभानपूर, मनापूर, मलकापूर गावांत जोरदार पावसाला सुरुवात झाली.
जवळपास तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही शेतांमध्ये पाणी देखील साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी पावसामुळे समाधान व्यक्त केले आहे. या पावसामुळे रखडलेल्या पेरण्याला वेग आला आहे. अनेकांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील काही भागाला अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तेथील पेरण्या रखडल्या असून, शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून आहे.