एसपीपीसीद्वारे घडणार सक्षम विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:34 AM2020-02-14T00:34:00+5:302020-02-14T00:34:22+5:30
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने पोलीस दलाच्या आधुनिकीकरणांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये चांगली नीतीमूल्ये रूजवून जबाबदार नागरिक घडविण्यासाठी एसपीसी (स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम) उपक्रम हाती घेण्यात आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने पोलीस दलाच्या आधुनिकीकरणांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये चांगली नीतीमूल्ये रूजवून जबाबदार नागरिक घडविण्यासाठी एसपीसी (स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम) उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३२ शासकीय शाळांची निवड करण्यात आली असून, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत ८ वी ९ वीच्या विद्यार्थ्यांना विविध कायद्यांसह नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली जात आहे.
पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्थापना दिनासह इतर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कार्याची माहिती दिली जाते. केंद्र शासनाच्या गृह विभागाने यापुढे पाऊल टाकत शालेय विद्यार्थ्यांमध्ये चांगली नीतीमूल्ये रुजवून एक जबाबदार नागरिक घडविण्यासाठी एसपीसी (स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम) उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी राज्यस्तरावर राज्यस्तरीय सनियंत्रण समिती आणि जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत गुन्ह्याचा प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, भ्रष्टाचार निर्मूलन, संवेदनशिलता व सहानुभूती, महिला व बालकांची सुरक्षितता, समाजाचा विकास, दुष्ट सामाजिक प्रवृत्तीस आळा घालणे, नीतीमूल्ये, शिस्त, आपत्तीची व्यवस्थापन व स्वच्छता इ. विषयांवर प्रशिक्षण दिले जात आहे.