३७७ परवानाधारकांची शस्त्रे पोलिसांकडे जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:00 AM2019-10-01T01:00:02+5:302019-10-01T01:01:33+5:30
जिल्ह्यातील ३७७ परवानाधारकांनी शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्याच्या सूचना जिल्हा दंडाधिकारी, पोलीस दलाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आजवर जिल्ह्यातील ३७७ परवानाधारकांनी शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत.
जिल्ह्यातील ५७४ जणांनी स्वसंरक्षणासह इतर कारणांनी शासकीय नियमानुसार परवाने घेऊन शस्त्रे घेतली आहेत. या शस्त्रधारकांना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शस्त्रे जमा करण्याच्या सूचना जिल्हा दंडाधिकारी, पोलीस दलाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. निवडणूक निकाल घोषित होईपर्यंत ही शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. निवडणूक कालावधीत परवानाधारकांनी शस्त्र वाहून नेण्यावर, बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजवर जिल्ह्यातील ३७७ परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस दलाकडे जमा केली आहेत.
शासकीय कर्तव्य पार पाडणा-या दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी, कर्मचारी व सराफा यांचे व्यतिरिक्त तसेच उच्च न्यायालयीन रिट पिटीशन क्र. ४११७/२०१४/ ४२४३/ २०१४ मधील आदेशास आधीन राहून संबंधितांना सूट देण्यात आली आहे.