सवलत योजनेत ‘एसटी’ला सव्वा कोटीचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 12:59 AM2020-02-02T00:59:53+5:302020-02-02T01:01:15+5:30
शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या माध्यमातून एसटीला मोठा आधार मिळाला असून, यातून जवळपास सव्वा कोटी पेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले आहे.
विकास व्होरकटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्रवासी भारमान वाढविण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपाय करणाऱ्या एसटी. महामंडळाच्या उपक्रमांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. परंतु, शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या माध्यमातून एसटीला मोठा आधार मिळाला असून, यातून जवळपास सव्वा कोटी पेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले आहे.
एसटी महामंडळ सध्या अत्यंत बिकट आर्थिक संकटाला तोंड देत आहे. खाजगी वाहतुकीचे मोठे आव्हान महामंडळासमोर निर्माण झाले आहे. अवैध वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी एसटी महामंडळाकडून पोलीस प्रशासनाला नेहमीच पत्र व्यवहार केला जातो. परंतु, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवैध वाहतुकीचा सर्रासपणे उपयोग केला जात आहे, याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे.
मध्यंतरी ‘हात दाखवा एसटी थांबवा’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याला ब-यापैकी प्रतिसादही मिळाला. परंतु, या उपक्रमाला चालकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. एसटी महामंडळाने आपल्या कामकाजात सुधारणा आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. परंतु, असे असतानाही एसटी तोटा कमी होण्याचे नाव घेत नाही. मध्यंतरी शाळा, महाविद्यालयांच्या सहलींसाठी एसटी महामंडळाने विशेष सवलत जाहीर केली. त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत.
एकट्या जालना जिल्ह्याचा विचार केल्यास चार ते पाच महिन्यांमध्ये सहलीच्या माध्यमातून एक कोटी ४० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
जिल्ह्यातील २२६ शाळांच्या सहली
विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी, यासाठी शाळा, महाविद्यालयांमार्फत प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या जातात. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील २२६ शाळांमधील १४ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहलीत सहभाग नोंदविला होता. यामुळे जालना जिल्ह्यातील एसटी महामंडळाला याचा मोठा लाभ झाल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.