दिंडी मार्गाच्या कामासाठी गौण खनिजाचा उपसा - दंड देण्यास ठेकेदाराची टाळटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:34 AM2021-03-01T04:34:33+5:302021-03-01T04:34:33+5:30
परतूर : शेगाव - पंढरपूर या दिंडी मार्गाच्या कामासाठी संबंधित कंपनीने परवानगी न घेता गौण खनिजाचा बेसुमार ...
परतूर : शेगाव - पंढरपूर या दिंडी मार्गाच्या कामासाठी संबंधित कंपनीने परवानगी न घेता गौण खनिजाचा बेसुमार उपसा केला होता. याप्रकरणी तहसील कार्यालयाने संबंधित कंपनीला तीन वर्षांपूर्वी १२ कोटी १७ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्या कंपनीने अद्याप दंडाची रक्कम भरलेले नाही.
परतूर तालुक्यातून शेगाव - पंढरपूर हा मार्ग जातो. या मार्गाचे मागील तीन वर्षांपासून सिमेंटीकरण सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा वापर करण्यात आला. या संबंधित कंपनीने परवानगी न घेता वाळू, मुरूम, माती, दगड यांचा उपसा केला होता. तालुक्यातील येणारा, परतवाडी, एकूरूखा व परतूर आदी शिवारातून गौण खनिजाचा उपसा करण्यात आला होता. वाळू पट्टयांचे लिलाव झाले नसतानाही या कंपनीने वाळूचाही मोठ्या प्रमाणात वापर केला. याबाबत तहसील कार्यालयाकडे नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची तहसील कार्यालयाने दखल घेऊन कंपनीने केलेल्या उत्खननाचा पंचनामा केला. तसेच वाहने जप्त करून कंपनीस २०१८ - १९ या वर्षात १२ कोटी १७ लाख ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, या दंडाविरुध्द संबंधित कंपनीने उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व आयुक्त कार्यालयात अपील केले आहे. तहसील कार्यालयाने दंड आकारून जवळपास तीन वर्ष उलटली आहेत. मात्र, कंपनीने दंडाची रक्कम अद्याप भरलेली नाही. विशेष म्हणजे, गौण खनिजाच्या वाहतुकीमुळे तालुक्यातील बहुतांश रस्त्यांवर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत.
रस्त्याचे काम निष्कृट दर्जाचे
दिंडी मार्गाच्या कामासाठी परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा उपसा करण्यात आला. दुसरीकडे सध्या झालेल्या रस्त्यावरही भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे सध्या ठिकठिकाणी रस्ता फोडण्यात येत आहे. या रस्त्याचे कामही निष्कृट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे.
दिंडी मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला १२ कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. याबाबत आपण संबंधित कार्यकारी अभियंत्याला पत्र देखील दिले आहे.
रूपा चित्रक, तहसीलदार, परतूर