नियमित औषधाेपचाराला यश, एचआयव्हीग्रस्त १२० मातांनी दिला एचआयव्हीमुक्त बालकांना जन्म
By विजय मुंडे | Published: February 8, 2024 07:01 PM2024-02-08T19:01:41+5:302024-02-08T19:02:51+5:30
एचआयव्ही बाधित गर्भवती मातांसह इतर रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून नियमित औषधी दिली जातात.
जालना : मागील १३ वर्षांत जिल्ह्यातील १२० एचआयव्हीग्रस्त मातांनी एचआयव्हीमुक्त बालकांना जन्म दिला आहे. नियमित तपासणी, उपचारामुळे बालके एचआयव्हीमुक्त जन्मली असून, जन्मानंतर १८ महिने त्या बालकांची नियमित तपासणी, उपचारही जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाकडून करण्यात आले आहेत.
एचआयव्ही एड्स म्हटलं की त्या व्यक्तीपासून चार हात लांब जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. विशेषत: महिला आणि तीही गर्भवती महिला असेल तर समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. शिवाय अशा गर्भवती मातांची मानसिकताही आजाराचे नाव ऐकूनच बिघडून जाते. एचआयव्ही बाधित मातांचे बाळ एचआयव्हीमुक्त जन्माला यावे, यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाकडून गर्भवती महिलांची वेळोवेळी चाचणी केली जाते. गत १३ वर्षांत एचआयव्हीची बाधा झालेल्या १२९ गर्भवती महिला आढळल्या होत्या. एआरटी सेंटरच्या मार्फत त्या मातांची तपासणी आणि औषधोपचार नियमित केले जात आहेत. १२९ पैकी १२० गर्भवतींनी नियमित औषधोपचार घेतल्याने त्यांचे बाळ एचआयव्हीमुक्त जन्मले आहे. जन्मानंतर बाळाला आवश्यक तो डोस देण्यासह सलग १८ महिने त्या बाळाची तपासणी, उपचार एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाकडून करण्यात आले आहेत.
एआरटी सेंटरमधून नियमित औषधोपचार
एचआयव्ही बाधित गर्भवती मातांसह इतर रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून नियमित औषधी दिली जातात. या सेंटर अंतर्गत भोकरदन, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा शहरात लिंक एआरटी सेंटर सुरू करण्यात आले आहेत. तेथेही रुग्णांना नियमित औषधी दिली जातात.
नियमित औषधोपचार घेतल्याने शक्य
गर्भवती महिलांची एचआयव्ही तपासणी केली जाते. ज्या मातांची चाचणी पॉझिटिव्ह येते त्यांचे समुपदेशन करून नियमित औषधोपचार केले जातात. नियमित औषधोपचार घेणाऱ्या एचआयव्हीग्रस्त मातांची बालके मात्र एचआयव्ही निगेटिव्ह जन्मली आहेत. नियमित औषधोपचार घेतल्याने ही बाब साध्य झाली आहे.
- डॉ. आर. एस. पाटील जिल्हा शल्यचिकित्सक
मागील सात वर्षांची स्थिती
वर्ष- एचआयव्ही बाधित माता, एचआयव्ही मुक्त बाळ
२०१७-१८- १०- ०९
२०१८-१९- ०५-०५
२०१९-२०- ०७- ०६
२०२०-२१- ०८- ०८
२०२१-२२- १३ - १३
२०२२-२३- १०-१०
२०२३-२४- १५- १५