गृहविभागाकडून आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो: रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 09:56 AM2023-09-02T09:56:01+5:302023-09-02T09:56:36+5:30
जालन्यात होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला अडचण आली असती त्यामुळे हे आंदोलन दडपण्यात आले
वडीगोद्री : गृहविभागाकडून आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो. पोलिसांमुळे हे प्रकरण चिघळल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला.
अंतरवाली सराटी येथील घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनी महाकाळा (अंकुशनगर ता. अंबड) येथील मनोज जरांगे यांच्या कुटुंबियांची शनिवारी पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास भेट घेत धीर दिला.
८ सप्टेंबर रोजी जालना शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला अडचण आली असती त्यामुळे हे आंदोलन दडपण्यात आले आहे. गृह विभागाकडून आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. पोलिस प्रशासनामुळे प्रकरण चिघळल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. यावेळी पदाधिकारी, आंदोलक उपस्थित हाेते.
३५० मराठा आंदोलकांविरूद्ध गुन्हे
अंतरवाली सराटी येथील घटनेच्या प्रकरणात ३५० मराठा आंदोलकांविरूद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्या तक्रारीवरून ऋषिकेश बेंद्रे, श्रीराम कुरणकर, राजू कुरणकर, संभाजी बेंद्रे, महारुद्र अंबरुळे, राजेंद्र कोटुंबे, भागवत तारख, दादा घाडगे, पांडुरंग तारख, अमोल पंडित, किरण तारक, अमोल लहाने, वैभव आवटे, किशोर कटारे, अविनाश मांगदरे, मयूर आवटे यांच्यासह ३०० ते ३५० आंदोलकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.