५०० पेक्षा अधिक वाहनांची ‘जीएसटी’कडून अचानक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:56 AM2019-09-10T00:56:44+5:302019-09-10T00:58:20+5:30
मंदीच्या गर्तेतून वाट काढत असलेल्या जालन्यातील उद्योगांच्या मागे ‘जीएसटी’ विभागाचा ससेमिरा लागल्याने मोठी खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मंदीच्या गर्तेतून वाट काढत असलेल्या जालन्यातील उद्योगांच्या मागे ‘जीएसटी’ विभागाचा ससेमिरा लागल्याने मोठी खळबळ उडाली. सोमवारी पहाटे २ वाजल्यापासूनच ‘जीएसटी’च्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीतून मुख्य मार्गाला लागणाºया चौकांमध्ये ट्रकची अचानक थांबवून तपासणी केली. यामध्ये चालकांकडे ‘ई-वे’ बिल आढळून आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालना एक मोठे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असल्याने प्राप्तीकर विभागासह जीएसटी विभागाचाही जालन्यावर नेहमीच करडी नजर असते. गेल्यावर्षी देखील ‘ई-वे’ बिलाअंतर्गत तपासणी केली असता एक कोटी रुपयांचा दंड व्यापारी आणि उद्योजकांना ठोठाविण्यात आला होता.
तसेच मध्यंतरी वेगवेगळे व्यापारक्षेत्र निवडून त्यांच्यावर अचानक कारवाई केल्याच्या घटनाही नवीन नाहीत.
सोमवारी पहाटेपासूनच औद्योगिक वसाहत तसेच जालन्याकडून औरंगाबादकडे आणि औरंगाबाद येथून जालन्याकडे येणा-या मालवाहतूक करणा-या ट्रकची ४० जणांच्या पथकाने तपासणी केली. यामध्ये एक लाख रूपयांपेक्षा जास्त किमतीचा माल वाहून नेला जात असेल तर त्या मालासोबत संबंधित ट्रक चालकाकडे ‘ई-वे’ बिल असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
परंतु, बहुतांश जणांकडे हे बिल आढळून आले नसल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले.
या संदर्भात राज्य कर उपायुक्त रवींद्र जोगदंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला. परंतु, नेमका किती वाहनांवर दंड आकारण्यात आला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत निश्चित झाले नसल्याचे ते म्हणाले. ई-वे बिलाची ही तपासणी ही राज्यभर सुरू असल्याचेही ते म्हणाले.