उसाअभावी गळीत हंगाम धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 01:02 AM2019-09-04T01:02:00+5:302019-09-04T01:02:38+5:30
यंदाचा गळीत हंगाम धोक्यात आल्याचे वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या मानाने उसाचे क्षेत्र अत्यल्प आहे. त्यातच गोदावरीचा पट्टा सोडल्यास अन्य तालुक्यांत ऊस नावालाच दिसतो. परंतु यंदा तर गोदावरी पट्ट्यातही उसाचे क्षेत्र घटले असून, यंदा समर्थ आणि सागर कारखान्यांना पुरेल एवढाच ऊस शिल्लक असल्याचे दिसून आले. या दोन कारखान्यांनी गेल्या वर्षी एक लाख ६७ हजार मेट्रिक टन ऊस स्वत:च्या पैशाने अन्य कारखान्यांना दिला होता. ती परिस्थिती यंदा राहिली नसल्याने यंदाचा गळीत हंगाम धोक्यात आल्याचे वास्तव आहे.
जालना जिल्ह्यात तीन सहकारी आणि दोन खाजगी साखर कारखाने आहेत. यंदा समर्थ आणि सागर अशा दोन कारखाना क्षेत्रात केवळ १५ हजार ७०० हेक्टरवर ऊस आहे. गेल्या दोन वर्षात या भागातील उसाचे उत्पादन घटले आहे. यंदा तर हे उत्पादन थेट २० टक्क्यांनी घटले आहे. गेल्यावर्षी या दोन्ही कारखान्यांनी मिळून ११ लाख ३७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. त्यावेळी साखरेचा उतारा हा ११.६० टक्के एवढा होता.
यंदा या दोन्ही कारखान्यांनाच ऊस कमी पडणार असल्याने जिल्ह्यातील बागेश्वरी, समृध्दी या दोन खाजगी कारखान्यांसह भोकरदन येथील रामेश्वर साखर कारखान्यांना उसाचा प्रचंड तुटवडा जाणवणार आहे. त्यातच या तिन्ही कारखान्यांना बाहेरून ऊस आणायचा म्हटले तरी तो जवळपास शिल्लक नाही. पैठणसह अन्य काही तालुक्यात ऊस आहे, परंतु त्या भागात पश्चिम महाराष्ट्रातील बडे साखर कारखाने हे शेतकऱ्यांना जास्तीचा दर देऊन ऊस घेऊन जातात.
गेल्या वर्षी देखील कमी पावसा मुळे हवा तेवढा ऊस शेतकऱ्यांना लावता आला नाही, तसेच मध्यंतरी प्रचंड चारा टंचाईने हैराण असलेल्या पशुपालकांना अनेक ऊस उत्पादक शेतक-यांनी त्यांच्या उसाचा चारा जास्त किमतीने पुरवल्याने देखील ऊस उत्पादन घटले आहे. जालना जिल्ह्यात जून ते आॅगस्ट या दरम्यान आडसाली उसाची लागवड ही देखील यंदा उशिराने झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी हे व्हीएसआय ८००७, को- ९६०३२, को-सी- ६७१ यसा जतीचा ऊस लावतात.
समर्थ, सागर पूर्ण उसाचे गाळप करणार
यंदा उसाचे उत्पादन कमी होणार, ही बाब निश्चित आहे. आमच्या कारखाना क्षेत्रातही आम्हाला हवा तेवढा ऊस यंदा उपलब्ध होणार नसल्याचे चित्र आहे. परंतु अशाही स्थितीत आम्ही आहे त्या उसातून जास्तीत जास्त गाळप करण्याचा प्रयत्न करू. लवकरच आमचे बॉयलर प्रदीपन कार्यक्रम होणार असून, शेतक-यांचे हित हेच आमचे हित राहणार आहे. त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन कमी निघणार असले तरी आम्ही संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे नियोजन करणार आहोत. - आ. राजेश टोपे, संचालक समर्थ साखर कारखाना, अंकुशनगर