ठिबकवरच उसाची लागवड करावी -देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:00 AM2019-08-30T01:00:52+5:302019-08-30T01:01:23+5:30

मराठवाड्यात उसासाठी लागणारे मुबलक पाणी नसल्याने, भविष्यात शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना ठिबक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Sugarcane should be cultivated only on drip - Devendra Fadnavis | ठिबकवरच उसाची लागवड करावी -देवेंद्र फडणवीस

ठिबकवरच उसाची लागवड करावी -देवेंद्र फडणवीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठवाड्यात उसासाठी लागणारे मुबलक पाणी नसल्याने, भविष्यात शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना ठिबक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ठिबकचे अनुदान आम्ही ८० टक्क्यांवर नेल्याचेही ते म्हणाले. गेल्या पाच वर्षात राज्याचे संपूर्ण प्रश्न सुटलेत असे मी म्हणणार नाही; परंतु आघाडी सरकारच्या तुलनेत आमची विकासाची गती ही निश्चितच चांगली असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस हे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाचवर्षात केलेल्या विविध कल्याणकारी योजना कशा प्रभावीपणे राबविल्या, याची माहिती दिली. शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी रूपये वाटप केले असून, मुद्रा योजना, जनधन योजनेतही महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचा दावा त्यांनी केला. मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाड्याच्या वाट्याचे १०२ टीमएसी पाणी आम्ही कुठेही वाया जाऊ न देता त्याचे सुक्ष्म नियोजन करण्यासाठी जलआराखडा तयार केल्याचे ते म्हणाले. या आराखड्यास मान्यता घेतल्याचे ते म्हणाले. वॉटरग्रीड योजनेचाही त्यांनी येथे उल्लेख केला. समुद्रात वाहून जाणारे पाणीही मराठवाड्यात वळवण्याचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतल्याचे ते म्हणाले.
आगामी निवडणुका या शिवसेने सोबत युतीने लढणार काय? यावर त्यांनी आम्ही संकटात एमेकांना साथ दिली, आता तर सत्ता आमचीच असल्याने युतीनेच निवडणूक होईल असे सांगून आम्ही विक्रमी मताधिक्यांने बहुमत मिळवू असे त्यांनी स्पष्ट केले. शिवेसेनेच युवा नेते आदित्य ठाकरे हे सकारात्मक असून, त्यांचा उत्साह वाखण्या जोगा आहे. त्यांच्या आशीर्वाद यात्रेलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रांवर गर्दी नसल्याने त्या यात्रा अपयशी ठरत असल्याचे सांगितले. जलयुक्त शिवार योजना ही यशस्वी ठरल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जालन्यातील खरपुडी परिसरात होऊ घातलेल्या सिडको प्रकल्पाची जमीन संपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, त्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क देखील भरले आहे. त्यामुळे आता हा सिडकोचा प्रकल्प जालन्यात येत्या काही महिन्यात मार्गी लागेल असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना नमूद केले. सिडको अन्यत्र हलविण्याचा कुठलाही विचार सध्या तरी नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जुन सांगितले.

Web Title: Sugarcane should be cultivated only on drip - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.