मराठा आरक्षणासाठी आत्महत्या हा पर्याय नाही -जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:13 AM2018-08-14T01:13:00+5:302018-08-14T01:13:47+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हे जरी खरे असले तरी, या समाजातील युवकांनी आत्महत्या करून आपले अमूल्य जीवन संपवू नये. युवकांमध्ये जे नैराश्य आले आहे ते दूर करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांना सोबत घेऊन आम्ही समुपदेशन यात्रा काढली आहे. आता पर्यंत ३६ गावांना यातून भेटी दिल्या असल्याची माहिती या यात्रेचे संयोजक आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हे जरी खरे असले तरी, या समाजातील युवकांनी आत्महत्या करून आपले अमूल्य जीवन संपवू नये. युवकांमध्ये जे नैराश्य आले आहे ते दूर करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांना सोबत घेऊन आम्ही समुपदेशन यात्रा काढली आहे. आता पर्यंत ३६ गावांना यातून भेटी दिल्या असल्याची माहिती या यात्रेचे संयोजक आ. हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आ. जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा वर्षभरापूर्वीपासून पेटला आहे. आधी लोकशाही मार्गाने मूक मोर्चे काढले त्याचा परिणाम झाला नाही. त्या नंतर आता ठोक मोर्चे, चक्का जाम, ठ्यिा आंदोलन, मुंडण आंदोलन आदी आंदोलनातून राज्य सरकारकडे आम्ही आरक्षणासाठी मागणी करत आहोत. मात्र शासनाकडून केवळ चुकीचे मुद्दे उपस्थित करून समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही आ. जाधव यांनी केला. आज सर्व पक्षात मराठा समाजाचे नेत आहेत, परंतु ते एकत्र नाहीत. त्यामुळे सरकार वेळकाढूपणा करत आहे. मराठा समाजाने त्यांचा दबावगट तयार केल्यास आरक्षणाची लढाई सोपी होऊ शकते, मात्र समाज एकत्र येण्यास तयार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आरक्षणासाठी स्वतंत्र अध्यादेश काढून त्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलावून त्यावर मंथन करण्याची गरज आहे. आज अनेकजण भावनिक होऊन आपले जीवन आत्महत्या करून संपवत असल्याने त्यांचा संसार उघड्यावर येत आहे. आपला समाज हा रडणारा नाही तर लढणारा समाज आहे. त्यामुळे खचून न जाता हिंमतीने तोंड देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संजय लाखे पाटील यांनी सांगितले की, मराठा आंदोलनात मुंडण आंदोलन करून एक विक्रम केला आहे. त्याची नोंद लवकरच लिम्का बुकमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगून येत्या काही दिवसात आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांच्या घरासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच प्रशांत वाढेकर यांनी औरंगाबादेतील अंबादास दानवे यांनी ज्या तरूणाला लाथा मारल्या तो तरूण जालना जिल्ह्यातील आहे, त्याचे चित्रीकरण पाहून आम्ही अंबादास दानवे विरोधात आयुक्तां कडे तक्रार करणार असल्याचेही वाढेकर म्हणाले. पत्रकार परिषदेस राजेश राऊत, विष्णू पाचफुले, राजेंद्र गोरे, सुभाष कोळकर, कृष्णा पडूळ आदींची उपस्थिती होती.