भाजपच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या- अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:46 AM2019-04-21T00:46:54+5:302019-04-21T00:47:13+5:30
देशातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची धमक केवळ आघाडीच्याच सरकारमध्ये असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथील प्रचार सभेत व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : देशात आणि राज्यात भाजपा - शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. देशातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची धमक केवळ आघाडीच्याच सरकारमध्ये असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथील प्रचार सभेत व्यक्त केले आहे.
जालना लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ चव्हाण यांची भोकरदन येथे शनिवारी सभा झाली. ते म्हणाले, २०१४ मध्ये अनेक गोंडस आश्वासने, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेमध्ये आले. मात्र, त्यानंतर केवळ पक्षामधील राजकीय नेत्यांनाच चांगले दिवस आले. सर्व सामान्य जनता, शेतकरी मात्र, भरडला गेला. त्यांच्या काळात १५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. एकट्या मराठवाड्यात २०० शेतक-यांनी जीव गमावले. विदर्भातील एका शेतकºयाने आत्महत्येपूर्वी मोदी व फडणवीस यांचे नाव लिहून चिठ्ठी ठेवली. तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत. या शेतक-याच्या घरी जाऊन मोदी व फडणवीस यांनी अच्छे दिन येतील म्हणून आश्वासन दिले होते़ या सरकारची ४३ कोटींची कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
शहीद पोलीस अधिका-यांबाबत भाजपच्या उमेदवार साध्वीने केलेले वक्तव्य म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा आहे. त्याचा चव्हाण यांनी निषेध केला. विलास औताडे यांनी मोदी आणि रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली. यावेळी आ. राजेश टोपे, माजी आ़ चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, हाजी इब्राहिम यांची भाषणे झाली. माजी आ़ चंद्रकांत दानवे, माजी आ़ संतोष दसपुते, माजी आ़ धोडीराम राठोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, हाजी इब्राहिम जाणी, रामदास पालोदकर, बाबूराव कुळकर्णी, श्रीराम महाजन यांची उपस्थिती होती़ महेश औटी यांनी सूत्रसंचालन केले. राहुल देशमुख यांनी आभार मानले़