उन्हाळा संपत आलाय.. टंँकर मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 01:00 AM2019-05-21T01:00:32+5:302019-05-21T01:00:37+5:30
जालना तालुक्यातील खरपुडी या गावात अद्याप टँकर सुरु करण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
दीपक ढोले / विष्णू वाकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गतवर्षी पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. अशी परिस्थिती असतानाही जालना तालुक्यातील खरपुडी या गावात अद्याप टँकर सुरु करण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
जालना शहरापासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर खरपुडी हे गाव आहे. या गावात कृषी विज्ञान केंद्र आहेत. गावाची लोकसंख्या ५ हजार ८०० आहे. तर जनावरांची संख्या ९०० आहे. गतवर्षी पाऊस न पडल्याने गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडीठाक पडली आहे.
या गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. गावातील पाण्याची व्यवस्था बिकट आहे. उन्हाळा संपत आला आहे. परंतु, अद्यापही गावात टँकर सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील शेतकरी कापूस, बाजरी, तूर, ऊस, ज्वारी, हरभरा ही मुख्य पिके घेतात. काही प्रमाणात मोसंबी, डाळिंब या फळबागांचेही क्षेत्र आहे. पाण्याअभावी त्याचेही सरपण होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी टँकरचे पाणी विकत घेऊन फळबागा जगवित आहे. परंतु, पाणी कमी असल्याने अडचणीत भर पडली आहे.
पाण्याची व्यवस्था नाहीच : जनावरांच्या चा-याचा प्रश्न
गावात पशु-पक्ष्यांची संख्या जवळपास ९०० आहे. नागरिकांना प्रशासनाच्या वतीने टँकर सुरु करण्यात आले नाही तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न दूरच. त्यामुळे जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात चारा उपलब्ध नाही. बाहेरुन जास्तीचे पैसे खर्च करुन चारा विकत घ्यावा लागत आहे.
पशुपालकांना जनावरांचे पालन पोषण करणे अवघड झाले आहे. त्यामुळे काही पशुपालक आपली जनावरे मिळेल त्या भावात विकून मोकळे होत आहेत. गावाच्या परिसरात शेळ््या चारणा-या एका महिलेने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, मागील दोन महिन्यांपासून शेळ््या भर उन्हात चाराव्या लागत आहेत. त्यातच कुठे पाणी मिळते तर कुठे मिळत नाही.
मोफत टँकरने पाणीपुरवठा
गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने येथील अरुण गिरी हे मोफत टँकरने पाणी पुरवठा करीत आहे.
टँकर आले की, ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी गर्दी करतात. शासकीय टँकर सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चारा छावणीची गरज
या गावात ९०० जनावरांची संख्या आहेत. यात गायी, म्हशी, शेळ््या, मेंढ्या इ. जनावरांचा समावेश आहे. सध्या गावात चारा उपलब्ध नाही. त्यातच माणसांनाच पाणी मिळत नसल्याने जनावरांना पाणी कुठून आणायचे, अशा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावात चारा छावणी सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.