दुष्काळात विद्यार्थ्यांना मिळाला शिक्षणासाठी आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:28 AM2019-01-21T00:28:23+5:302019-01-21T00:28:51+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून उभा केलेल्या वडीगोद्री येथील आश्रमामुळे शेतकऱ्यांच्या व अनाथ मुलांना दुष्काळी परिस्थितीत शिक्षणासाठी आधार मिळाला आहे.
राजू छल्लारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून उभा केलेल्या वडीगोद्री येथील आश्रमामुळे शेतकऱ्यांच्या व अनाथ मुलांना दुष्काळी परिस्थितीत शिक्षणासाठी आधार मिळाला आहे. यामुळे सद्य:स्थितीत अंबड, घनसावंगी व गेवराई तालुक्यातील ६७ विद्यार्थी ज्ञानार्जन करित आहेत.
सर्व धर्माच्या मुलांना आपलं जीवन सुसंस्कारीत घडविता यावे, यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय व्हावी, या हेतूने अखिल भारतीय श्री. गुरूदेव सेवामंडळ गुरूवकुंज आश्रम (जिल्हा, अमरावती) अंतर्गत येथे श्री. गुरूदेव सेवाश्रमाची स्थापना सन १९६३ मध्ये करण्यात आली होती.
भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, तत्कालीन गृहमंत्री गुलजारीलाल नंदा, विनोबा भावे, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, पाचलेंगावकर महाराज अशा अनेक थोर मंडळींनी या आश्रमाला भेटी दिल्या आहेत. या आश्रमामधील मुलांची नियमित सकाळी ध्यान साधना करणे, सूर्य नमस्कार, सामुदायिक प्रार्थना, योगासने, मल्लखांब अशी दिनचर्या ठरलेली आहे.
राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाची मान्यता ५२ विद्यार्थ्यांची आहे. पण, सद्या स्थितीत दुष्काळी परिस्थितीमुळे येथे ६७ विद्यार्थी रहात आहेत. यात गरजूवंत, शेतकरी, अनाथ आदी मुलांचा समावेश आहे. याविद्यार्थ्यांना दररोज शिक्षण देण्यात येते.
मात्र, ५५ वर्षांपूर्वी या आश्रमाचे बांधकाम करण्यात आले असल्याने यातील काही खोल्या जिर्ण झाल्या आहेत. सद्या स्थितीत खोल्यांची दुरूस्ती करण्यासाठी संस्थेकडे आर्थिक बजेट नसल्याने दानशूर व्यक्तींनी यास सढळ हाताने मदत करावी, तसेच या तिर्थक्षेत्राचा विकास आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी होत आहे. आश्रमाची दुरुवस्था झाल्याने याकडे प्रशासनानेही लक्ष देण्याची गरज आहे. दुष्काळात शेतक-यांच्या व अनाथ मुलांना राहण्याची सोय होत आहे.