मागासवर्गीय उमेदवारांनी निवडणुक अर्ज मागे घेत दिला मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 06:01 PM2023-10-25T18:01:59+5:302023-10-25T18:03:04+5:30
निवडणुकीवर प्रत्यक्ष बहिष्कार टाकणारे प्रल्हादपुर तालुक्यातील प्रथम गाव ठरले आहे.
भोकरदन: मराठा आरक्षणासाठी प्रल्हादपूर ग्रामपंचायत निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे येथील निवडणूक रद्द होण्याच्या मार्गावर आहे.
भोकरदन तालुक्यातील पेरजापुर व प्रल्हादपुर ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतमध्ये प्रल्हादपुर गावात ग्रामपंचायत सदस्य पद रिक्त झाले होते त्यासाठी पोटनिवडणुक लागली होती.या पोटनिवडणुकीसाठी मागासवर्गीय प्रवर्गातील प्रभांग क्रमांक ३ मधून विलास गायकवाड व अक्षय गायकवाड या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, ग्रामस्थांनी मराठा आरक्षणासाठी निवडणुकीवर बहिष्कार घालत नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतला.त्यानंतर दोन्ही मागासवर्गीय उमेदवारांनी ग्रामस्थांच्या निर्णयाला पाठिंबा देत मराठा आरक्षण आंदोलनाला समर्थन देत उमेदवारी अर्ज आज मागे घेतले.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या दोघांचे गावकरी व तालुक्यातील मराठा सेवकांनी तहसील कार्यालय येथे स्वागत केले. मराठा आरक्षणप्रश्नी इतर समाजबांधवही सोबत असल्याचे दिसून आल्याने सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्यावतीने आभार मानण्यात आले. मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत निवडणुकीवर प्रत्यक्ष थेट बहिष्कार टाकणारे प्रल्हादपुर गाव हे तालुक्यात प्रथम गाव ठरले आहे