डॉक्टरांअभावी शस्त्रक्रिया लांबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:29 AM2019-02-07T00:29:01+5:302019-02-07T00:29:38+5:30
जिल्हा शासकीय रूग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून जवळपास ८० महिला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून जवळपास ८० महिला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी आल्या आहेत. त्यांची आवश्यक असणारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी जेवण तसेच अन्य काही पदार्थ न खाण्याचा सल्ला या महिलांना देण्यात आल्याने दोन दिवसांपासून आम्ही जेवणही केले नसल्याचे महिलांनी सांगितले.
या जिल्हा रूग्णालयातील प्रकारा संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांना विचारले असता, आपण बैठकीत असून, नंतर बोलतो असे सांगितले.
जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रारंभी गाव पातळीवर आरोग्य शिबीर घेऊन महिलांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी राजी करण्यात आले होते. त्यांना मंगळवारीच जालन्यातील जिल्हा रूग्णालयात बोलावण्यात आले. त्यांची मंगळवारीच शस्त्रक्रियेपूर्वी कराव्या लागणाऱ्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. तसेच त्यांना जिल्हा रूग्णालयातील एका हॉलमध्ये विश्राम करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली. दोन दिवसांपासून या महिला येथे थांबल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
एकीकडे जालन्यात ४० कोटी रूपये खर्च करून महिला व बाल रूग्णालय उभारले आहे. असे असताना या शस्त्रक्रिया करण्यासाठी महिलांना जिल्हा सामान्य रूग्णालयात का पाठवले असा सवाल केला जात आहे. त्यातच दोन दिवसांपासून महिला शस्त्रक्रियेसाठी आल्या असताना संबंधित वैद्यकीय अधिकारी का आले नाहीत, की तसेच नियोजन असून ते डॉक्टर गैरहजर राहिले का, असेही विचारले जात आहे.
या शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट दिले आहे. ते उद्दिष्ट हे मार्च महिन्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असते,
या शस्त्रक्रियेस राजी झालेल्या महिलांनाही थोडीबहूत आर्थिक मदत शासनाकडून केली जाते. वैद्यकीय अधिकारी न आल्यानेच या शस्त्रक्रिया लांबल्याचे बोलले जाते.
उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर मिळतात अनेक लाभ
डॉक्टरांनाही या शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास त्यांना वेतनवाढीसह त्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंद घेऊन प्रमाणपत्र देण्यात येते. तसेच प्रत्येक जिल्ह्याला यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिलेला असल्याने तो खर्च करणेही अनिवार्य असते.
महिलांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी तयार करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याचे महत्व पटवून देण्यासह लोकसंख्या वाढीचे दुष्परिणामही समजावून सांगावे लागत असल्याने हे मोठे जिकिरीचे काम असल्याचे सूत्रांनी सांगितले.