रात्रभर पाळत ठेवली... पहाटे टँकर येताच, ५० लाख रुपयांचे बायोडिझेल केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 07:17 PM2021-11-03T19:17:57+5:302021-11-03T19:19:13+5:30
अंबड तालुक्यातील दोदडगाव शिवारातील बारसवाडा फाट्यावरील एका धाब्याजवळ बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना मिळाली.
वडीगोद्री (जि.जालना) : अंबड तालुक्यातील बारसवाडा फाटा येथे बेकायदेशीर बायोडिझेल विक्री होत असल्याची माहिती मिळताच, पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री पाळत ठेवली. पहाटे तीन वाजेच्या सुमारास बायोडिझेल घेऊन टॅंकर येताच, छापा टाकून ५० लाख रुपये किंमतीचे २१ हजार लिटर बायोडिझेल जप्त केले. ही कारवाई पुरवठा विभागाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास केली.
अंबड तालुक्यातील दोदडगाव शिवारातील बारसवाडा फाट्यावरील एका धाब्याजवळ बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पुरवठा विभागास कारवाई करण्याचे आदेश दिले. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरील ठिकाणी जाऊन पाहिले असता, तेथे काहीच आढळले नाही. मात्र, खबऱ्याने पक्की खबर दिल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री रात्रभर पाळत ठेवून पहाटे तीन वाजेच्या सुमारास बायोडिझेलचे टँकर येताच, छापा टाकला. पुरवठा विभागाने तब्बल २१ हजार लिटर बायोडिझेल यासह अन्य साहित्य, असा एकूण ५० ते ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी रिया बसैय्या, पुरवठा विभागाचे निरीक्षक प्रकाश जाधव, अंबड तालुका पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार विश्वास धर्माधिकारी आदींनी केली.
दूनगाव शिवारातील एका हॉटेलजवळ अवैधरित्या बायोडिझेलची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. याठिकाणी तपासणी केली असता, काही साहित्य आढळून आले नाही. मात्र, तेथे बायोडिझेलची विक्री होत असल्याचे खबऱ्याने सांगितले. त्यानंतर रात्रभर पाळत ठेवून पहाटे बायोडिझेल जप्त केले.
- विश्वास धर्माधिकारी, नायब तहसीलदार