पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, तरुणाचा खून केला अन् गर्दीत उभा राहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 01:06 PM2022-10-25T13:06:32+5:302022-10-25T13:06:58+5:30
ऐन दिवाळीत रक्तरंजित पहाट, बदनामी केल्याचाही राग होता आरोपीच्या मनात
अंबड (जि. जालना) : शहरातील एका ४० वर्षीय तरुणाचा सोमवारी पहाटे चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. संशयित मारेकऱ्याने त्याच्या पत्नीशी मयताचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून व बदनामी केल्याचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ऐन दिवाळीतील लक्ष्मीपूजन सणाची पहाटच रक्तरंजित झाल्याने अंबड शहर मात्र हादरून गेले आहे.
राजेंद्र विठ्ठल भोरे (४० रा.बोरी, ता.अंबड ह.मु. होळकरनगर, अंबड), असे मयत युवकाचे नाव आहे. राजेंद्र भोरे हा शहरातील होळकरनगर भागात वास्तव्याला असून, तो एका औषधी दुकानावर कामाला होता. राजेंद्र भोरे सोमवारी पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी घराच्या बाहेर गेला होता; परंतु सकाळी राजेंद्र भोरे याचा मृतदेह होळकरनगर भागात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, सपोनि. सोमनाथ नरके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
या प्रकरणात मयताची पत्नी नीता राजेंद्र भोरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संशयित पाराजी गहिनाजी दिवटे (रा.होळकरनगर, अंबड) याने राजेंद्र भोरे यांच्या पोटात, छातीवर, बरगड्यावर चाकूने सपासप वार करून खून केला. मयताचे आरोपीच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय व बदनामी केल्याचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोनि. शिरीष हुंबे करीत आहेत. मयत युवकाच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.
खून केला अन् गर्दीत उभा राहिला
या प्रकरणातील संशयित आरोपी पाराजी दिवटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. राजेंद्र भोरे याचा खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. या गर्दीतच संशयित आरोपी उभा होता. मिळालेल्या माहितीनंतर संशयित पाराजी दिवटे याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.