निलंबित अधिकारी दीड महिन्यात पूर्वपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:07 AM2018-05-10T01:07:24+5:302018-05-10T01:07:24+5:30
परतूरचे गटविकास अधिकारी आर.एल. तांगडे यांना दीड महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. परंतु त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरी मंजूर प्रकरणात निकष डावलून विहिरींच्या प्रस्तावाला मंजूरी देणारे परतूरचे गटविकास अधिकारी आर.एल. तांगडे यांना दीड महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. परंतु त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिंचन विहीर मंजुरीच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेत मोठा गोंधळ उडाला होता. यावरून सर्वसाधारण सभेतही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वादळी चर्चा करून सिंचन विहिरींचे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. सदस्यांचा रोष लक्षात घेऊन तसेच कागदपत्रांची छाननी करून तांगडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. एक हजार १९६ विहिरींपैकी ३०२ विहिरींच्या प्रकरणात निकष डावलल्याचे पुढे आले होते असे जिल्हा परिषदेने गटविकास अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. हे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले होते.
दरम्यान आर.एल. तांगडे हे मुळचे कृषी अधिकारी आहेत, त्यांच्याकडे परतूरच्या गटविकास विभागाचा अतिरिक्त पदभार दिला असताना निकष डावलून सिंचन विहिरींना मान्यता देण्याच्या मुद्यावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येऊन तसा प्रस्ताव आयुक्तांना सादर केला होता.
नंतर २७ एप्रिल रोजी प्राप्त पत्रानुसार निलंबित तांगडे यांना पुन्हा सेवेत घेऊन त्यांच्याकडे बदनापूर येथील गटविकास अधिका-याचा पदभार देण्यात आला आहे. हे पत्र देखील जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या स्वाक्षरीने निघालेले आहे.