'स्वाभिमानी'चे भाजप कार्यालयावर 'कांदे फेको' आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 02:09 PM2020-09-18T14:09:08+5:302020-09-18T14:10:20+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जालना : कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी सकाळी शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कार्यालयाच्या गेटवर कांदे फेकून निर्यात बंदी निर्णयाचा निषेध केला.
केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. मागणी मान्य होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जालना येथील भाजपच्या कार्यालयावर कांदा फेको आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रवि कदम, दीपक वाघ, बदनापूर उपाध्यक्ष संतोश कदम, दलित आघाडीचे अध्यक्ष भारत मगरे आदींची उपस्थिती होती.