प्रेम प्रकरणात हस्तक्षेप करणे बेतले स्वप्नीलच्या जीवावर; हत्याप्रकरणात दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:55 PM2019-06-19T12:55:18+5:302019-06-19T12:57:53+5:30
नात्यातील मुलीस प्रेमप्रकरणाबाबत जाब विचारला होता
पारध (जालना ) : अखेर स्वप्नील भुते यांच्या मारेकऱ्यांना पारध पोलिसांनी बुधवारी (दि. १९ ) सकाळी एकाला औरंगाबादवरुन तर दुसऱ्याला बुलढाणा येथून ताब्यात घेतले. कुमार अनूप सोनवणे आणि व एक अल्पवयीन असे आरोपींची नावे आहेत. प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुन दोघांनी काटा काढल्याची माहिती पोलिसांना दिली.
मयत स्वप्नील भुते यांच्या नात्यातील मुलीसोबत कुमार सोनवणे याचे प्रेमप्रकरण होते. याची कुणकुण स्वप्नील भुते याला लागली होती. यामुळे काही दिवसापूर्वी त्याने आरोपी कुमार सोनवणे याला समजावून सांगितले. मात्र त्याने हो हो म्हणत कानाडोळा करत सदर मुलीचा पिच्छा सोडलाच नाही. यामुळे स्वप्नील याने सदर मुलीला समजावून सांगत वारकरी संप्रदायातील आपले कुटुंबिय आहे. अशा प्रेम प्रकरणामुळे आपली समाजात बदनामी होईल, असे समाजावून सांगितले. मात्र, सदर मुलीने ही माहिती आपला प्रियकर कुमार सोनवणे याच्या कानावर घातली आणि आता माझ्या घरी आपल्या प्रेमाची माहिती कळले. त्यामुळे मला जीव दिल्याशिवाय पर्यायच उरला नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रियकर कुमार सोनवणे याने आपला मित्र सोबत घेऊन शुक्रवारी दुपारी मासरुळ (जि. बुलढाणा) येथे दुचाकीने जाऊन मयत स्वप्नील भुते याला गाठले. ‘तुझ्या नात्यातील मुलीचा मी नाद सोडला’ असे खोटे सांगून चल फिरायला जाऊ असे म्हणत दुचाकीवरुन त्याला भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात आणले.
( बुलढाण्याच्या वारकरी युवकाचा जालन्यात दगडाने ठेचून निर्घुण खून )
शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पारध पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकरी श्रीरंग सुरडकर यांच्या शेतात दोन्ही आरोपींनी मद्यपान केले. दारुची झिंग चढल्याने दोघांनी सदर मुलीच्या प्रेमप्रकरणावरुन स्वप्नीलशी वाद घालून त्याला काठीने बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्याला ठार केले. या प्र्रकरणाचा पारध पोलिसांनी तीन दिवसात बारकाईने तपास करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे.