स्वप्नील भुतेचे मारेकरी अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:39 AM2019-06-20T00:39:16+5:302019-06-20T00:39:59+5:30
भोकरदन तालुक्यातील पारध शिवारात झालेल्या स्वप्नील भुते याच्या खून प्रकरणात पोलिसांनी बुधवारी सकाळी दोघांना जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन / पारध : भोकरदन तालुक्यातील पारध शिवारात झालेल्या स्वप्नील भुते याच्या खून प्रकरणात पोलिसांनी बुधवारी सकाळी दोघांना जेरबंद केले. एकाला औरंगाबाद येथून तर दुसऱ्याला बुलडाणा येथून ताब्यात घेण्यात आले. नात्यातील एका मुलीला प्रेमप्रकरणात न पडण्याचा सल्ला देणे स्वप्नीलच्या जिवावर बेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
पारध शिवारातील श्रीरंग दगडू सुरडकर यांच्या शेतातील बांधावरील झाडाखाली १४ जून रोजी सायंकाळी स्वप्नील श्रीरंग भुते (वय-२४ रा. मासरूळ ता.जि.बुलडाणा) याचा खून झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरूवात केली होती. मात्र, घटनेला चार दिवसांचा कालावधी लोटला तरी आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने नातेवाईकांमधून संताप व्यक्त होत होता.
पोलिसांनी मोबाईल संभाषणाच्या माहितीवरून तपासाला गती दिली. त्यावेळी औरंगाबाद येथे असलेल्या कुमार अनुप सोनुनेची माहिती मिळाली. पोलिसांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास औरंगाबाद येथील हनुमान नगर येथून कुमार सोनुने याला नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपल्या मित्राचे नाव सांगितले.
दुस-या पथकाने बुलडाणा येथे कारवाई करून दुस-या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक एस. चेतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जयभाये, पारधचे सपोनि शंकर शिंदे, बुलडाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप उबाळे, बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, प्रदीप पवार, पोलीस कर्मचारी रामेश्वर सिनकर, जगदीश बावणे, गणेश पायघन, सागर देवकर, पारध पोलीस ठाण्याचे प्रकाश सिनकर, बाजीराव माळी, किशोर मोरे, शिवाजी जाशव, समाधान वाघ, जीवन भालके महिला पोलीस कर्मचारी अनिता उईके, कल्पना बोडखे यांनी खून प्रकरणातील आरोपींच्या मुस्क्या आवळल्या.
भोकरदन तालुक्यात यापूर्वीही पारध व परिसरात मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या घरातील नातेवाईकांनीच जंगलात मुलीला नेऊन तिचा गळा दाबून खून केला होता. विशेष म्हणजे त्या मुलीला तिच्या प्रियकराकडे नेत असताना हा प्रकार घडल्याने त्यावेळी देखील परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
प्रेमप्रकरणातील हस्तक्षेप बेतला जिवावर
कुमार अनुप सोनुने (रा. सुवर्णनगर बुलडाणा) याचे स्वप्नील भुतेच्या नात्यातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. स्वप्नीलने १० जून रोजी बुलडाणा येथे जाऊन सोनुने याला समज दिली होती. तसेच ‘वारकरी संप्रदायातील आपले कुटुंब आहे. अशा प्रेम प्रकरणामुळे आपली समाजात बदनामी होईल’, असे त्या मुलीलाही समजावून सांगितले.
मात्र, त्या मुलीने ही माहिती प्रियकर कुमार सोनुने याच्या कानावर घातली. ‘आता माझ्या घरी आपल्या प्रेमाची माहिती कळली. त्यामुळे मला जीव दिल्याशिवाय पर्यायच उरला नाही’, असे सांगितले.
त्यानंतर कुमार सोनुने याने त्याच्या मित्राला सोबत घेऊन १४ जून रोजी दुपारी मासरुळ (जि.बुलडाणा) गाठले. स्वप्नीलचे घर आणि त्यानंतर शेत गाठून त्याला दुचाकीवरून पारध- पिंपळगाव रेणुकाई परिसरात आणले. शेतकरी श्रीरंग सुरडकर यांच्या शेतात ‘त्या’ मुलीसमवेत असलेल्या प्रेम प्रकरणावरून त्याच्याशी वाद घातला. बीअरची बाटली स्वप्नीलच्या डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर लाकडी दांड्याने मारहाण केली. स्वप्नील खाली कोसळल्यानंतर त्याच्या डोक्यावर मोठा दगड घालून खून केला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
मोबाईल कॉलमुळे जाळ्यात
पारध परिसरात एका तरुणाचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. तीन दिवस उलटूनही आरोपींचा शोध लागत नव्हता. पोलिसांनी सुरुवातीला मयत तरुणाची ओळख पटविली. मात्र घटनास्थळी संशयजन्य पुरावे नसल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसासमोर आव्हान होते.
घटनेच्या दिवशी मयत स्वप्नील भुते याला आरोपींनी शेतातून दुचाकीवरुन नेताना शेतात असलेल्या विजय साळवे यांनी पाहिले होते. तसेच त्यांनी मोबाईलवरुन संभाषण केल्याची माहिती साळवे यांनी पोलिसांना दिली. यामुळे पोलिसांनी हाच धागा पकडून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.