मित्र,रुग्णांसाठी रक्तदान करणारा ‘स्वयंभू’ ग्रुप...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 06:37 PM2019-07-13T18:37:15+5:302019-07-13T18:39:07+5:30
२० वर्षापूर्वी रक्तदान करण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नव्हते.
- संजय देशमुख
२० वर्षापूर्वी ज्यावेळी रक्तदान करण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नव्हते. रक्तदान ही संकल्पना रूजविण्यासाठी आम्ही ३० ते ४० मित्रांनी एकत्रित येऊन जुना जालना भागात स्वयंभू ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपच्या माध्यमातून अध्यक्ष प्रदीप मोहरीर व त्यांच्या सर्व साथीदारांनी रक्तदानाचा हा यज्ञ २० वर्षानंतरही तेवढ्यात तन्मयतेने पुढे नेला आहे. मित्राच्या स्मृतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करणे तसेच दर महिन्यातील दुसऱ्या रविवारी थॅलेसेमिया रुग्णांसाठी जनकल्याण रक्तपेढीत रक्तदान करण्यात येते.....
रक्तदान करण्याची प्रेरणा कुठून मिळाली ?
जुना जालना भागातील मित्र सोमनाथ चव्हाण याच्या हृदयाचे दोन्ही व्हॉल्व्ह निकामी झाल्याचे लक्षात आले. तेव्हा सर्व मित्रांनी मिळून आर्थिक मदत करून केईएम रुग्णालयात त्याचे व्हॉल्व्हही बदलले. परंतु त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे सर्व मित्रांना मोठा धक्का बसला. मित्राच्या स्मृतीनिमित्त काहीना काही केले पाहिजे, यातूनच रक्तदान शिबीर घेण्यासह थॅलेसेमिया रुग्णासाठी रक्तदान करण्याचा निर्णय स्वयंभू ग्रुपच्या युवकांनी घेतला.
रक्तदानातून किती रुग्णांना मदत ?
जिल्ह्यात थॅलेसेमीया आजाराचे जवळपास शंभरपेक्षा अधिक नोंदणी झालेले रुग्ण आहेत. या रुग्णांना दर महिन्याला रक्त बदलावे लागते. त्यामुळे जवळपास २०० जण यासाठी आपापल्या वेळेनुसार रक्तदान करतात. आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक रुग्णांना रक्तदान दिल्याने आमच्याकडून काहीना काही मदत झाल्याचे समाधान आहे.
मैत्रीतून सुरू झाले रक्तदान शिबीर
आजकाल प्रत्येकजण स्वार्थासाठी मैत्री करताना दिसत आहेत. वरवरची मैत्री करून एकमेकांचे दोष दाखविण्याऐवजी केवळ सर्वकाही चांगले आहे, असे बोलून वेळ मारून नेली जात आहे. परंतु आम्ही निखळ मैत्री जपण्यासह मित्राच्या स्मृतीनिमित्तही काही सकारात्मक व्हावे, यामुळेच हा उपक्रम हाती घेतला आहे.
स्वयंभू ग्रुपच्या माध्यमातून रक्तदानासह गणेशोत्सवा दरम्यान, पर्यावरण विषयक वेगवेगळे उपक्रमही राबविले जातात. परंतु ६ जुलै हा आमचे मित्र कै. सोमनाथ चव्हाण यांचा स्मृती दिन असल्याने जुलैमधील जो रविवार पहिला येईल तेव्हा रक्तदान शिबीर घेतो. ह्दयाचा व्हॉल्व्ह निकामी झाल्याने मित्राचा मृत्यू झाला होता. त्याच्या स्मरणार्थ तसेच थॅलेसेमिया या रुग्णांसाठी आम्ही रक्तदान करतो - मिलींद लांबे