'तिखट मिरचीचा 'गोडवा', शेतकऱ्याचा नाद खुळा'; ११ एकर मिरचीतून घेतले ५५ लाखांचे उत्पन्न
By विजय मुंडे | Published: July 19, 2023 04:00 PM2023-07-19T16:00:11+5:302023-07-19T16:00:58+5:30
योग्य नियोजन करून शेती केली तर चांगले उत्पन्न; शेतकऱ्यांच्या मिरची शेतीतून ५० मजुरांच्या हातालाही मिळाले काम
- फकिरा देशमुख
भोकरदन (जि.जालना) : ११ एकरात विविध प्रकारच्या मिरचीची लागवड करून एका शेतकरी कुटुंबाने तीन महिन्यांत तब्बल ५५ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. आणखी दोन महिने ही मिरची विक्री होणार असून, मिरचीला असाच भाव राहिला तर उत्पन्न एक कोटीच्या घरात जाणार आहे. तिखट मिरचीचा 'गोडवा' चाखण्याची किमया धावडा (ता.भोकरदन) येथील शेतकरी कुटुंबाने साधली आहे.
भोकरदन तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करतात. यावर्षी ५ हजार हेक्टरमध्ये मिरची लागवड झाली आहे. धावडा येथील शेतकरी एकबालखाँ अक्रमखाँ पठाण, खालेदखाँ पठाण या भावंडांनी ११ एकरमध्ये १३ ते ३० एप्रिल या कालावधीत गादीवाफे बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर टाकून ठिबकद्वारे पाणी देऊन सिमला, पिकाडोर, बलराम, ज्वलरी, तेजा अशा विविध प्रकारच्या मिरचीची चार बाय सव्वा अंतरावर ठिबक नळीच्या दोन्ही बाजूने लागवड केली. या लागवडीसाठी पठाण कुटुंबाला १० लाख ८० हजार रुपयांचा खर्च आला आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे केलेला खर्च निघतो की नाही याची भीती या कुटुंबाला होती;
परंतु एकबालखाँ पठाण यांनी न डगमगता मिरची पिकावर औषधी, खते, फवारणी केली. शेवटी मिरचीसाठी पाणी कमी पडू लागले तेव्हा टँकरने पाणी विकत घेऊन मिरची जोपासली. जूनमध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. त्यांना ११ हजार, १० हजार, ९ हजार असा भाव मिळाला. तर सिमला मिरचीला ४ हजार ५०० व पिकडोरला सुद्धा ४ हजारांचा भाव मिळाला. त्यामुळे आजवर त्यांना ५५ लाख ३० हजार रुपयांचे उत्पादन मिळाले. यापुढील काळात असाच भाव राहिला तर त्यांचे उत्पन्न एक कोटीच्या घरात जाणार आहे. शिवाय दोन महिन्यांनंतर त्यांना लाल मिरचीचे उत्पन्न मिळणार आहे.
योग्य नियोजन करून शेती केली तर चांगले उत्पन्न
आम्ही किराणा व्यावसायिक असलो तरी शेती कसण्याची आवड आम्ही जोपासली आहे. यातूनच यंदा ११ एकर शेतात विविध प्रकारच्या मिरचीची लागवड केली होती. योग्य व्यवस्थापन आणि कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या कष्टामुळे सध्या चांगले उत्पन्न मिळत आहे. आजवर ८ तोडे झाले असून, त्यासाठी ४० महिला मजूर दररोज शेतात कामाला येतात. शिवाय १० सालदार आहेत. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून शेती केली तर त्यांना चांगले उत्पन्न मिळेल.
- एकबालखाँ पठाण, शेतकरी धावडा