टंचाई दूर करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:36 AM2019-05-18T00:36:55+5:302019-05-18T00:37:49+5:30
लवकरच शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.
जालना : जालना शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनातर्फे सवोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. वॉल्व्ह दुरुस्ती, मोठ्या प्रमाणात सुरु असलेली गळती दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून लवकरच शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.
जालना शहरातील नवीन जालना भागासाठी घाणेवाडी जलाशयातून पाणी पुरवठा केला जात होता. मात्र घाणेवाडी जलाशयाने तळ गाठल्यामुळे या जलाशयातून नवीन जालना भागाला केला जाणारा पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे नवीन जालना भागाला देखील जायकवाडी- जालना या पाणी पुरवठा योजनेव्दारेच पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच या योजनेवरील वॉल्व्ह विविध ठिकाणी फोडून पाणी चोरण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले होते. शिवाय काही ठिकाणी जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर माजी आ. कैलास गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर व आपण स्वत: जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर टाकला. त्यानंतर पाचोड ते दावरवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणात सुरु असलेली पाणी चोरी रोखण्यात यश आले आहे. अंबड येथील २४ एमएलडी क्षमतेच्या जलशुध्दीकरण केंद्रातून जालना शहराला मागील काही दिवसापर्यंत केवळ सहा एमएलडीच पाणी पुरवठा होत होता. आता जवळपास पंधरा ते सोळा एमएलडी पाणी पुरवठा शहराला होत असून अंबड जलशुध्दीकरण केंद्रात बंद अवस्थेत असलेले पंधरा एमएलडी क्षमतेचे दुसरे जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वीत करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनातर्फे युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. हे जलशुध्दीकरण केंद्र कार्यान्वीत झाल्यानंतर जालना शहराला जायकवाडी- जालना या योजनेव्दारे जवळपास ३५ ते ४० एमएलडी पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे जालना शहरवासियांना आठ आठवाड्यातून दोन वेळा पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.