तहसील कार्यालयात दुपारीच शुकशुकाट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:09 AM2019-06-26T00:09:50+5:302019-06-26T00:10:32+5:30
तहसील कार्यालयात दुपारचे साडेतीन वाजले तरी बहुतांश विभागात कर्मचारी गैरहजर असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना ताटकळत राहावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील तहसील कार्यालयात दुपारचे साडेतीन वाजले तरी बहुतांश विभागात कर्मचारी गैरहजर असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना ताटकळत राहावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.
जिल्ह्यात पावसाने उशिराने का होईना; पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत. शाळा महाविद्यालयाचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामुळे उत्पन्नाचा दाखल, जातीचा दाखल, आदीसह कागदपत्र गोळा करण्यासाठी विद्यार्थी, पालकवर्गाची रेलचेल वाढली आहे. मात्र तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी दुपारचे साडेतीन वाजले तरी कार्यालयात गैरहजर होते. यामुळे अनेकांची गैरसोय झाली. शासकीय कार्यालयात येणा-यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने कर्मचा-याची दुपारची जेवणाची वेळ अर्धातास केली आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. याची सर्वशी जबाबदारी कार्यालयीन प्रमुखाची असणार आहे. मात्र जुन्या सवयीनुसार कर्मचारी तासनतास कार्यालयातून गायब राहत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
कार्यालयीन वेळेत कर्मचारी गैरहजर असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम कार्यालयीन प्रमुखाचे असेल, असे स्पष्ट निर्देश शासनाचे आहेत. मात्र येथील तहसील कार्यालयातील सर्वच विभागप्रमुखांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
यामुळे शासकीय कर्मचारी दुपारी जेवणाच्या सुटीच्या नावाखाली कार्यालयातून तासन्तास गायब राहत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.