काय न्यायचेय ते न्या; परंतु मारू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:22 AM2019-06-05T01:22:41+5:302019-06-05T01:22:58+5:30
मला मारू नका, हवे ते घेऊन जा अशी आर्तविनवणी मंडळ अधिकारी भाग्येश भार्डीकर यांनी चोरट्यांना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दरवाजा नॉक करून दोन जण अचानक घरात घुसले, घरात मी एकटा होतो, दार उघडल्या उघडल्या दोन जणांनी माझ्या गळ्याला चाकू लावला आणि काय आहे ते लवकर दे नसता जिवे मारू अशी धमकी दिली. मला मारू नका, हवे ते घेऊन जा अशी आर्तविनवणी मंडळ अधिकारी भाग्येश भार्डीकर यांनी चोरट्यांना केली.
भाग्येश भार्डीकर हे मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घरात बसले होते. त्याचवेळी दोन जणांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून दागिने आणि रोख रक्कम तसेच भार्डीकर यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबविली.
ही घटना घडल्यानंतर भार्डीकर यांनी आरडाओरड केली परंतु, कोणी येण्याच्या आत चोरट्यांनी तेथून पोबारा केला. पळून जात असतांना त्यांचा एक मोबाईल आणि एक चाकू तेथेच सोडून ते चोरटे पसार झाले.
या प्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यानंतर रात्री कदिम जालना पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. भार्डीकर यांच्या मुलाचे लग्न असल्याने दागदागिन्यांची खरेदी आणि रोख रक्कम घरात होती. जवळपास ३० हजार रूपये रोख आणि दागिने लंपास केले. पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.