वनविभागाचे बनावट कार्यालय थाटून ४८ लाखांना फसविले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 08:16 PM2017-11-11T20:16:42+5:302017-11-11T20:16:56+5:30
वनविभागात विविध पदावर नोकरी देण्याचे अमिष दाखवून सात बेरोजगारांकडून ४८ लाख ५० हजार रुपये उकळून त्यांना बनावट नोकरीचे आदेश देऊन फसविल्याचा प्रकार समोर आला आहे.
जालना - वनविभागात विविध पदावर नोकरी देण्याचे अमिष दाखवून सात बेरोजगारांकडून ४८ लाख ५० हजार रुपये उकळून त्यांना बनावट नोकरीचे आदेश देऊन फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शनिवारी कदीम जालना पोलीस ठाण्यात आठ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एका महिलेचा समावेश आहे.
या संदर्भात येथील समर्थनगर भागात राहणारे देविदास राणुजी वाघमारे (५५) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित शुभम दिनेशसिंग राजूपत, बलदेवसिंग रामसिंग राजपूत, डी.बी. राजपूत (रा. साखरर्खेडा) पवन राजेंद्र लोंढे (रा. सिंदखेडराजा), राजकुमार बी. वाघमारे (रा. डिग्रस, ता. सिंदखेडराजा) विवेक धनवे (रा. चिखली, ता. बुलडाणा) यांच्यासह अन्य दोघांचा समावेश असून, पैकी एक महिला आहे.
संशयितांनी संगनमत करून फिर्यादीच्या नातेवाइकासह अन्य सहा जणांना वनविभागात विविध पदांवर नोकरी देण्याचे अमिष दाखविले.
यासाठी त्यांच्याकडून २०१६-१७ दरम्यान वेगवेगळ्या तारखांना आरटीजीएसद्वारे तब्बल ४८ लाख ५० हजार रुपये घेतले. वनविभागात नोकरी दिल्याचे भासविण्यासाठी चिखली येथे घर भाड्याने घेऊन तिथेच वनविभागाचे कार्यालय थाटले. एवढ्यावरच न थांबता सात जणांना बनावट नियुक्तीपत्र तयार करून, ते खरे असल्याचे भासवत राजकुमार वाघमारे या तरुणाला वनअधिकारी म्हणून नोकरीवर रूजू करून घेतले.
मात्र, दोन-तीन महिने उलटूनही पगार न झाल्यामुळे, तुमच्या पदाला मान्यता येताच पदार निघेल असे सांगून सतत दिशाभूल केली. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संशयितांवर शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.