सावंगी वरगणे येथील तलाठी लाचेच्या जाळ््यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:30 AM2020-02-12T00:30:14+5:302020-02-12T00:31:03+5:30
वाळूची गाडी चालू देण्यासाठी व चालकाचा घेतलेला मोबाईल परत देण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील सावंगी वरगणे येथील तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वाळूची गाडी चालू देण्यासाठी व चालकाचा घेतलेला मोबाईल परत देण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील सावंगी वरगणे येथील तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडले. तलाठी निवृत्ती ताबजी वाघ (४६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
वाळूची गाडी चालू देण्यासाठी व चालकाचा घेतलेला मोबाईल परत देण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील सावंगी वरगणे येथील तलाठ्याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीवरून सापळा रचून लाचेची पडताळणी केली असता, निवृत्ती वाघ व त्यांच्या सोबतचा खाजगी इसम कृष्णा वरगणे (३१, सावंगी वरगणे) यांना पंचासमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तलाठी निवृत्ती वाघ व कृष्णा वरगणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम ताटे, पोलीस निरीक्षक एस. एस. शेख, कर्मचारी ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, राम मते, अनिल सानप, आत्माराम डोईफोडे, कृष्णा देठे, सचिन राऊत, शिवाजी जमधडे, गजानन कांबळे, गणेश चेके, गणेश बुजाडे, जावेद शेख यांनी यशस्वी केल्याचे सांगण्यात आले.