मंडल आयोगावर बोलणे म्हणजे पारावरच्या गप्पा नव्हेत; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 11:56 AM2024-06-24T11:56:55+5:302024-06-24T11:57:04+5:30

मनोज जरांगे यांनी मंडल आयोगाचा अभ्यास करावा, जी गोष्ट कधी होणे शक्य नाही, ती मागणी ते करताय: लक्ष्मण हाके

Talking about Mandal Commission is not pass time chat; Laxman Hake teases Manoj Jarange | मंडल आयोगावर बोलणे म्हणजे पारावरच्या गप्पा नव्हेत; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला

मंडल आयोगावर बोलणे म्हणजे पारावरच्या गप्पा नव्हेत; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला

जालना : मनोज जरांगे यांना मंडल आयोग कधी निर्माण झाला, काही माहिती नाही. घटनात्मक अधिकार असलेल्या मंडल आयोगावर बोलणे म्हणजे पारावरच्या गप्पा आहेत का ? असा टोला पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना लगावला आहे. जालना येथील एका खासगी रुग्णालयात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात रविवारी लक्ष्मण हाके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मंडल आयोग देशासाठी आहे. मनोज जरांगे यांनी मंडल आयोगाचा अभ्यास करावा, जी गोष्ट कधी होणे शक्य नाही, ती मागणी ते करताय. आरक्षण हे खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही. फक्त कुणबी या नोंदी असतील तर त्यांना कोणी रोखू शकत नाही, मंडल आयोगात कुणबी ओबीसीत बाय डिफॉल्ट आहेत. कुणबी दाखले रद्द करता येत नाहीत. पण, मराठा लिहिले त्यापुढे कु. लावायचं. कुणबी हा प्रवर्ग वेगळा आहे. खानदेश कुणबी गिरणानदी किनाऱ्यावर राहतात, खऱ्या कुणबी यांचे राहणीमान वेगळं आहे. व्हीजेएनटी आणि ओबीसींचे आरक्षण एकच असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले.

निधी देताना हात आखडता
या सरकारने ओबीसी समाजाचा बट्ट्याबोळ करून टाकला आहे. हे सरकार फक्त एका विशिष्ट जातीसाठी आहे. सरकार महाज्योतीला निधी देताना हात आखडता घेत आहे. बारा बलुतेदारांच्या नावावर जमिनी नाहीत. १० टक्के आरक्षण देताना सरकारने केलेले सर्वेक्षण १०० टक्के बोगस आहे. हे सर्वेक्षण गायकवाड आयोगापेक्षा बोगस असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले.

दोघांच्या जठरावर सूज
ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर जालना शहरातील एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. उपचाराचा रविवारी दुसरा दिवस आहे. १० दिवसांच्या आमरण उपोषणामुळे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना उलट्यांचा त्रास जाणवत आहे. यासोबतच लक्ष्मण हाके यांचा बीपीदेखील वाढलेला आहे. दोघांच्या जठरावर सूज असल्याने त्यांना लिक्वीड अन्नदेखील पचत नसल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांना उलट्यांचा त्रास होत आहे. लक्ष्मण हाके यांना बीपीची गोळी दिली असून, अद्याप रक्तदाब नियंत्रणात आला नसून, उपचार सुरू असल्याचे डॉ. सुहास विघ्ने यांनी सांगितले.

Web Title: Talking about Mandal Commission is not pass time chat; Laxman Hake teases Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.