फोनवर बोलत जाळ्यात ओढलं; मोठीशी लग्न जमलं अन् लहानगीला पळवून नेलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:35 AM2022-04-07T11:35:00+5:302022-04-07T11:35:37+5:30

फोनवर मोठीसोबत लहानीचे बोलणे वाढले आणि दोघांत प्रेम फुलले

Talking on the phone, he trap minor girl; engagement with elder sis but run away with younger lover | फोनवर बोलत जाळ्यात ओढलं; मोठीशी लग्न जमलं अन् लहानगीला पळवून नेलं

फोनवर बोलत जाळ्यात ओढलं; मोठीशी लग्न जमलं अन् लहानगीला पळवून नेलं

Next

जालना : मोठ्या बहिणीशी विवाह जुळला... फोनवर बोलणं सुरू झालं... त्यातच वेळी लहानगीही अधून-मधून बोलायला लागली. लहानगीशी बोलणं वाढलं... त्यातूनच लहानीवर प्रेम जडलं अन् मंगळवारी सकाळी एका शाळेतून तिला पळवून घेऊन गेल्याची घटना जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात घडली. कदीम जालना पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अजय राजू गायकवाड (२४ रा.पैठण) असे संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बालाजी पदमाने यांनी दिली.

अजय गायकवाड हा मूळचा अहमदनगरचा. त्याचे आई-वडील काही वर्षांपासून पैठण येथे, तर आजी-आजोबा हे जालन्यात राहतात. त्याचा काही महिन्यांपूर्वी एका तरुणीशी विवाह जुळला. हा विवाह मे महिन्यांत होणार होता. त्यामुळे दोघांचेही मोबाइलवर बोलणे सुरू झाले. अधून-मधून त्या तरुणीच्या १४ वर्षांच्या लहानग्या बहिणीलाही तो बोलू लागला. त्यांच्यात बोलणं वाढत गेलं. त्यातून तिच्यावर प्रेम जडलं. अल्पवयीन असल्याने त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् पळवून जाण्याचा प्लॅन आखला. काही दिवसांपूर्वीच तो आजी-आजोबांकडे आला.

मंगळवारी सकाळी ती अल्पवयीन मुलगी शिकत असलेल्या शाळेत गेला. शिक्षकांना मुलीच्या पोटात दुखतंय, तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे खोटे सांगून घेऊन गेला. या प्रकरणी सायंकाळी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ पथके तैनात करून, सायंकाळी जालना-अंबड रोडवरील हरतखेडा फाट्याजवळून अजय गायकवाड याला मुलीसह ताब्यात घेतले. त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला असून, सदरील गुन्हा पिंक मोबाइलकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पदमाने यांनी दिली.

२५ किलोमीटर पायी चालले
मंगळवारी सकाळी संशयित अजय गायकवाड हा अल्पवयीन मुलीला घेऊन पायी पैठणकडे निघाला होता. ते दोघे जवळपास २५ किलोमीटर पायी चालले. पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास दोघांनाही हरतखेडा फाट्याजवळून ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Talking on the phone, he trap minor girl; engagement with elder sis but run away with younger lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.