आतापासूनच टँकरचा आधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:34 AM2018-10-04T00:34:00+5:302018-10-04T00:34:45+5:30
भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे परिसरातील पंधरा गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलसंकटाच्या भीतीने ग्रामस्थांत चिंंता पसरली आहे. सर्वसामान्यांचे डोळे परतीच्या पावसाकडे लागले आहेत.
चांधई एक्को आणि बाणेगाव मध्यम प्रकल्पातून परिसरातील राजूरेश्वर मंदिर, राजूर, बाणेगाव, चांधई एक्को, चांधई ठोंबरी, चांधई टेपली, लोणगाव, पळसखेडा ठोंबरी, चिंचोली निपाणी, खामखेडा इ. पंधरा गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच राजूरला दर्शनासाठी येणाऱ्या भावि कांची तहान भागविली जाते. परंंंतु यावर्षी एकही जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतक-यांची खरीप हंगामातील पिके वाया गेली असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे संभाव्य पाणी समस्येचे सावट उभे राहिले आहे. राजूरसाठी नव्याने टंचाईग्रस्त योजनेअंतर्गत बाणेगाव मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सध्या पावसाळा असूनही प्रभागनिहाय चार दिवसांआड राजूरकरांना पाणी मिळत आहे. पावसाळ्यात चार दिवसानंतर पाणी मिळत असताना संभाव्य हिवाळा, उन्हाळ्यात काय परिस्थिती राहील, याची चिंंता ग्रामस्थांना सतावत आहे. सध्या राजूरकरांची तहान खाजगी टँकरवर सर्वाधिक भागवली जात आहे. पाणी समस्येची तीव्रता आणि ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन खाजगी टँकर चालकांनी पाण्याचे दर वाढवल्याने सर्वसामान्य जनता आर्थिक कोेंडीत सापडली आहे. येथे बहुतांश नागरिक मोल मजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह भागवतात परंतु त्यांना निम्मी मजुरी पाण्यासाठी खर्चावी लागत असल्याने नागरिकांत संताप आहे. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांची वाट लागल्याने मजुरांना रोजगार मिळणे अवघड होऊन बसले आहे. चांधई एक्को प्रकल्पात २० ते २५ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पाची पाळू उघडी आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता बघता जोत्याखाली असलेली पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणी पातळीत घटली आहे.तसेच होत असलेला अवैध पाणी उपसा थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.