जालना जिल्ह्यातील टँकर कमी होईना; भर पावसाळ्यात टँकरची संख्या पुन्हा २७५ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 07:50 PM2024-07-30T19:50:37+5:302024-07-30T19:50:49+5:30
हंगामाच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे यंदा पाऊस चांगला बरसेल, असे सांगण्यात येत होते.
जालना : पावसाळा सुरू होऊन सुमारे ४५ दिवसांचा कालावधी झालेला असला तरी, जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. जुलै महिना सुरू झालेला असला तरी, अद्याप जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती संपलेली नसल्याचे दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात १६७ गावे आणि ४५ वाड्यांना २७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ७ जूनपासून जिल्ह्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे.
हंगामाच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे यंदा पाऊस चांगला बरसेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. मात्र, जालना जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. यामुळे भरपावसाळ्यात टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे.
मागील वर्षी हीच स्थिती
मागील वर्षीदेखील कमी पावसामुळे पावसाळ्यात टँकर सुरू ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यंदादेखील अशीच स्थित जिल्ह्यात दिसून येत आहे. मागील वर्षी २५ जुलै रोजी २२० टँकरद्वारे जिल्ह्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा २८ जुलै रोजी जिल्ह्यात १६७ गावे आणि ४५ वाड्यांना २७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
३१ जुलैपर्यंत मुदत
मागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यात टंचाई निवारण आराखड्यास मंजुरी दिली होती. टंचाई आराखड्याची मुदत ३१ जून रोजी संपली होती. मात्र, कमी पाऊस झाल्याने अनेक गावांमध्ये भीषण टंचाई सुरू होती. यामुळे टंचाई आराखड्यास ३१ जुलैपर्यंंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु, टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आराखड्यात पुन्हा मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर येण्याची शक्यता आहे.
भोकरदन शहरात ३५ टँकर सुरू
सध्या भोकरदन शहरातील नागरिकांची तहान मागील आठ महिन्यापासून टँकरच्या पाण्यावर भागविण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरण पूर्णपणे काेरडे पडलेले असल्याने भोकरदन शहराला पावसाळ्यातदेखील टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. सध्या शहरात ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.