‘जेईई’ मध्ये तवरावालाचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:46 AM2018-06-11T00:46:34+5:302018-06-11T00:46:34+5:30
जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात येथील डॉ. मनोज तवरावाला यांचा मुलगा पार्थ तवरावालाने देशातून ५७९ रँक तर सीए अंबेश बियाणी यांचा मुलगा सिध्देश बियाणी याने ८२९ रँक मिळवून यश संपादन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात येथील डॉ. मनोज तवरावाला यांचा मुलगा पार्थ तवरावालाने देशातून ५७९ रँक तर सीए अंबेश बियाणी यांचा मुलगा सिध्देश बियाणी याने ८२९ रँक मिळवून यश संपादन केले आहे.
यंदा ही परीक्षा २० मे रोजी प्रथमच आॅनलाइन पार पडली. अत्यंत क्लिष्ट अशा या परीक्षेत पार्थने जी रँक मिळवली आहे, ती जालना जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा वर्षात कोणत्याच विद्यार्थ्याने मिळवली नाही. पार्थचे प्राथमिक शिक्षण पोदार इंग्रजी शाळेत झाले. लहानपणीच त्याने आपल्याला आयआयटी करण्याचे ध्येय ठरवले होते, आणि त्या दृष्टीने त्याने तसे प्रयत्न केले. हैदाराबाद येथे राहून त्याने जेइई अॅडव्हान्स परीक्षेची तयारी केली. यासाठी त्याला वडिल डॉ. मनोज तवरावाला, आई डॉ. अनिता तवरावाला यासह मोठी बहीण रक्षा तवरावाला यांचे मार्गदर्शन लाभल्याचे पार्थने लोकमतशी बोलताना सांगितले.
आयआयटी पवई येथे त्याला अॅडमिशन घ्यायचे आहे. यापूर्वी पार्थने एनटीएस तसेच के.व्ही.पी.वाय. या परीक्षेतही मोठी भरारी घेतली होती.
जालन्यातील विद्यार्थ्यांनी नीट तसेच जेईई अॅडव्हान्समध्ये मोठे यश मिळवून जालन्यातील मुलांची हुशारी सिध्द केल्याने त्यांचे मान्यवरांकडून स्वागत होत आहे.
जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा युपीएससी नंतरची भारतातील अत्यंत प्रतिष्ठेची व तेवढीच अवघड आव्हानात्मक परीक्षा म्हणून ओळखली जाते.
सिध्देश बियाणीचे यश
येथील सीए अंबेश बियाणी यांचा मुलगा सिध्देश बियाणी याने देखील जेइई अॅडव्हान्समध्ये मोठी झेप घेतली असून, त्याल आॅलइंडिया रँक ८२९ मिळाली आहे. अपेक्षेपेक्षा चांगली रँक मिळाल्याचे त्याला समाधान असून, त्याला मुंबईतील आयआयटीमध्ये इकॉनॉमिक्स शाखेत भविष्य घडवायचे आहे. सिध्देशचे प्राथमिक शिक्षण येथील गोल्डन ज्युबिली शाळेत झाले आहे. या यशासाठी वडील, आई तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगून त्याने या परीक्षेची तयारी ही कोटा येथे केल्याचे तो म्हणाला.