कवी मनाचा शिक्षक गीतातून करतोय प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:44 AM2020-02-23T00:44:30+5:302020-02-23T00:45:53+5:30
बदनापूर तालुक्यातील पठार देऊळगाव जिल्हा परिषद शिक्षक म्हणून काम करणारे जाकीर शेख यांनी आपल्या कवी मनातून ‘फेमस पिताजी’ हे गीत लिहिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बदनापूर तालुक्यातील पठार देऊळगाव जिल्हा परिषद शिक्षक म्हणून काम करणारे जाकीर शेख यांनी आपल्या कवी मनातून ‘फेमस पिताजी’ हे गीत लिहिले आहे. मद्यपी व्यक्तीमुळे कुटुंबाची झालेली वाताहत, सोशल मीडियावर आलेले कृत्य आणि त्याने सोडलेली दारू, याबाबतची मांडणी गीतात करण्यात आली आहे. कोकणातील पालघर परिसरात गीताचे चित्रण झाले आहे.
जालना शहरातील रहिवासी आणि पठार देऊळगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करणारे जाकीर शेख हे कवी म्हणूनही ओळखले जातात. कवी मनाच्या या शिक्षकाने ‘फेमस पिताजी’ हे गीत लिहिले आहे. तीन मिनिटे ५१ सेकंदाच्या या गीतात वडिलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे हैराण झालेला मुलगा आणि दारू पिऊन केलेल्या हरकती सोशल मीडियात प्रसिध्द झाल्यानंतर पित्याने सोडलेली दारू याचे चित्रण या गीतात केले आहे. या गीताला जालना येथीलच संगीतकार विशाल कांबळे यांनी संगीत दिले आहे.
विशेषत: ‘आला बाबूराव’ फेम सुरेश कांबळे यांनी या गीतात अभिनय केला असून, साजन बेंद्रे यांनी गीत गायले आहे. तर नृत्यदिग्दर्शक म्हणून धीरज भालेराव यांनी बाजू संभाळली आहे. कोकणातील पालघर परिसरातील कोळीवाड्यात आणि समुद्र किनारी या गीताचे चित्रीकरण झाले आहे. एका शिक्षकाने शहरातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन मांडलेली मद्यपी व्यक्तीची कथा आणि त्याने सोडलेली दारू या गीतातून समाज प्रबोधन करणारी आहे. विशेषत: या कामासाठी कवी मनाच्या शिक्षकाने घेतलेला पुढाकार वाखण्याजोगा आहे.
कलेतून प्रबोधन
ज्ञानदानाचे काम करताना आपण आपल्या कवितेचा छंद जोपासला आहे. यातूनच समाजात गंभीर प्रश्न असलेल्या दारूवर गीत लिहून समाज प्रबोधन करण्याचा संकल्प केला. या संकल्पनेला गीत चित्रीकरणाच्या माध्यमातून मूर्त रूप आल्याचे समाधान आहे.
-जाकेर शेख,
शिक्षक, पठार देऊळगाव