धुणी-भांडी करून मुलांना शिकविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:03 AM2020-03-08T00:03:02+5:302020-03-08T00:03:05+5:30
पतीच्या निधनानंतर मुलांच्या पंखांना बळ देत पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जालना येथील सीताबाई राजू चांदोडे यांनी धुणं-भांडी केली. त्यांच्या कष्टामुळे मुलं उच्चशिक्षित झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पतीच्या निधनानंतर मुलांच्या पंखांना बळ देत पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जालना येथील सीताबाई राजू चांदोडे यांनी धुणं-भांडी केली. त्यांच्या कष्टामुळे मुलं उच्चशिक्षित झाली असून, त्यांनी मुकबधीर मुलीला शिक्षण देऊन तिचा विवाहही केला आहे.
जुना जालना विभागातील अशोकनगर येथे सीताबाई राजू चांदोडे राहतात. सातवीपर्यंत शिकलेल्या सीताबाई २० वर्षांपूर्वी पती राजू चांदोडे यांच्यासोबत भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. थोरला मुलगा आनंद, मधला अजय आणि धाकटी मुलगी अंजली. त्यात अंजली ही मूकबधिर. कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सीताबाई चांदोडे यांनी घराबाहेर पडून धुनी-भांडी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सन २०१० मध्ये त्यांचे पती राजू चांदोडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने घराची संपूर्ण जबबदारी सीताबाई चांदोडे यांच्याकडे आली. त्यांनी आपल्या मुलांना बळ देण्याचा निर्धार केला.
धुणं-भांडी करूनच त्यांनी मोठ्या मुलाला अभियांत्रिकीचे शिक्षण दिले. दुसऱ्या मुलाने शिक्षणानंतर घरीच शालेय बॅग विक्री आणि आॅन लाईन सेवेचा व्यवसाय सुरू केला. मूकबधीर अंजलीचा गतवर्षी विवाह झाला असून, ती सासरी नांदत आहे. सीताबाई चांदोडे या आजही धुनी-भांडी करून कुटुंबाला हातभार लावत असून, मुलं स्वत:च्या पायावर उभी राहिल्याचे समाधान सीताबाई चांदोडे यांच्या चेह-यावर दिसून येते.
कष्टाला प्रामाणिकतेची जोड हवी
पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण असे अनेक प्रश्न होते. मात्र, प्रामाणिकपणे केलेल्या कष्टामुळे मुलांच्या पंखांमध्ये बळ भरता आले. महिलांनी आपल्या समोरील प्रश्न सोडवून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत.
-सीताबाई चांदोडे, जालना