अडचणींवर मात करण्याची शिकवण कामी आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:01 AM2019-09-05T01:01:40+5:302019-09-05T01:02:06+5:30
अडचणींवर मात करण्यासाठी शिकवण आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे मी शासकीय सेवेत रुजू होऊ शकलो, असे बदनापूर येथील तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले.
बदनापूर : शेगाव येथील कन्या शाळेतील शिक्षिका कुमोद सराफ भेटल्या आणि माझी शिक्षणातील गोडी वाढली. मला गणित विषयाची आवड नव्हती. त्यामुळे ४ थीच्या स्कॉलरशिपमध्ये कमी मार्क मिळाले. मात्र, शिक्षिका सराफ यांनी गणित विषय चांगल्या पध्दतीने शिकविला. त्यामुळे ७ वीमध्ये स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षणाची आवड निर्माण झाली. अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी दिलेली शिकवण आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे मी शासकीय सेवेत रुजू होऊ शकलो, असे बदनापूर येथील तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले.
डीएड् केल्यानंतर औरंगाबाद येथील ज्योती विद्यामंदिरात प्राथमिक शिक्षिकेची नोकरी मिळाली. नोकरी करीत असताना एक्सर्टनल बीएड केले. पुढे शिकण्याची आवड होती. मात्र, नोकरी, घर संभाळून यश मिळेल का ? हा विचार सतत येत होता. मात्र क्लासेस जॉईन केल्यानंतर मोहन घाडगे या शिक्षकांनी मार्गदर्शन केल्याने प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला व जोमाने परीक्षेची तयारी केली. मला येणाऱ्या अडचणी घाडगे सर सोडवायचे. मला नेहमी अभ्यासासाठी प्रोत्साहित करायचे. त्यामुळे सन २००४ मध्ये मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम नायब तहसीलदार झाले व आज तहसीलदार म्हणून काम करीत आहे.
वडिलांची नोकरी आणि बदलीमुळे नवीन गाव
वडील शासकीय नोकरीत असल्यामुळे त्यांची सतत बदली होत होती. त्यामुळे माझ्या शाळा अनेकवेळा बदलल्या. शाळा बदलत असल्या तरी वेळोवेळी चांगले मार्गदर्शन करणारे शिक्षक मिळाले. या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात यशस्वी होता आले. आजच्या युवकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. सातत्यपूर्ण अभ्यास केला तर यश नक्की मिळते.
इयत्ता ५ वीत असताना वडिलांची बदली शेगाव येथे झाली. त्यामुळे मला कन्या शाळेत पाचवीमध्ये प्रवेश घ्यावा लागला. मात्र, शाळेत मी नवीन असल्यामुळे कुणीही ओळखीचे नव्हते. त्यामुळे मला शाळेत काही विचारण्याची भिती वाटत होती. तेथे मला कुमोद सराफ या शिक्षिका भेटल्या. त्यांनी माझी वर्गातील विद्यार्थ्यांसोबत ओळख करून दिली. त्यामुळे अनेक मैत्रिणी मिळाल्या. खेळताना, जेवताना या मुली माझ्यासोबत राहू लागल्या. सराफ व इतर सर्वच शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे माझ्या जीवनाची यशस्वी वाटचाल झाली आहे.
तयारीदरम्यान उच्चशिक्षितांशी झाली स्पर्धा
नोकरी करीत असताना क्लास जॉईन केला. मात्र, या क्लासमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी डॉक्टर, इंजिनिअरसह इतर उच्चशिक्षित विद्यार्थी येत होते. या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करता येईल का ? हा विचार काही काळ आला. मात्र, शिक्षक मोहन घाडगे यांच्या मार्गदर्शनामुळे अडचणींवर मात करता आली. अभ्यासातील सातत्य आणि यश मिळविण्याचा केलेला संकल्प यामुळे आपण यशस्वी झालो.