बॅनर फाडले, आम्ही कपडे फाडू; मनोज जरांगे-पाटील यांचा मंत्री, आमदारांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 08:16 AM2023-11-14T08:16:10+5:302023-11-14T08:16:22+5:30
जरांगे पाटील यांना रविवारी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते अंतरवाली सराटी येथे आले.
वडीगोद्री (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर येथे जे घडलं ते चुकीचं आहे. तेथील मंत्री आणि आमदारांची मस्ती आहे. त्यांनी तर फक्त आमचे बॅनर फाडले, आम्ही त्यांचे कपडे फाडू शकतो, मी मराठा समाजाला शांत ठेवलंय, हुं जरी म्हटलं तर तुमची पूर्ण जिरवील, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
जरांगे पाटील यांना रविवारी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते अंतरवाली सराटी येथे आले. सोमवारी सकाळी ते म्हणाले की, सामान्य मराठ्यांनी मनावर घेतले तर त्यांना आयुष्यभर गुलाल लागणार नाही. विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या हातात कायदा नाही. कोणतीही शक्ती मराठ्यांना आरक्षणापासून रोखू शकत नाही.
ज्या नोंदी सापडल्या त्यावरून मराठा कुणबी एकच आहे, असा अहवाल तयार केला जात आहे. त्याबाबत कायदा मंजूर करून राज्यभरात सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही.
- मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलनाचे नेते
काय म्हणाले जरांगे पाटील?
बीड येथील अधिकारी मराठ्यांच्या पोरांना जाणूनबुजून टार्गेट करीत आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी बीडच्या प्रकरणात लक्ष घालावे.
गोरगरीब मराठ्यांची आंदोलन करणारी पोरं गुंतविली जात आहेत. हे तुम्ही दोन दिवसांत थांबवा नसता नाइलाजाने बीड जिल्हा रस्त्यावर उतरेल.
ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे थांबवावे!
ओबीसींच्या संवैधानिक अधिकाराचे संरक्षण करण्याचा अधिकार ओबीसी नेत्यांनाही आहे. मात्र, मनोज जरांगे-पाटील हे वारंवार ओबीसी नेत्यांना टार्गेट करून मराठा व ओबीसींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे योग्य नाही, अशी नाराजी व्यक्त करत ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे थांबवावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सोमवारी केले.