तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यांची किनगाव चारा छावणीला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 01:05 AM2019-05-22T01:05:17+5:302019-05-22T01:06:03+5:30
लोकमतमध्ये बातमी प्रसिध्द होताच सकाळी तहसीलदार मनीषा मेने, मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर, तलाठी प्रवीण शिनगारे व कर्मचा-यांनी भेट देऊन शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : तालुक्यातील किनगाव शिवारात अंबड बाजार समितीच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या चारा छावणीतील जनावरे व शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला लोकमतने मंगळवारच्या अंकात वाचा फोडली. लोकमतमध्ये बातमी प्रसिध्द होताच सकाळी तहसीलदार मनीषा मेने, मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर, तलाठी प्रवीण शिनगारे व कर्मचा-यांनी भेट देऊन शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन चारा वाटपास सुरुवात केली.
किनगाव शिवारात बाजार समितीच्या वतीने चारा छावणीस शुक्रवारी सुरुवात करण्यात आली, सध्या या छावणीमध्ये ७१८ जनावरे असल्याची नोंद आहे. शनिवारी काही शेतकºयांनी गोंधळ घालून तब्बल १७ टन हिरवा ऊस चारा पळवून नेला. यामुळे छावणीतील संपूर्ण चारा संपल्याचे कारण देत बाजार समितीने रविवार व सोमवार असे सलग दोन दिवस जनावरांना चारा दिला नाही. तसेच या ठिकाणच्या गलथान नियोजनामुळे रोहिलागड तसेच परिसरातील शेकडो मुक्या जनावरांना साध्या सावलीची व्यवस्था करण्यातही बाजार समिती प्रशासन अपयशी ठरले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर लोकमत प्रतिनिधीने चारा छावणीला भेट देऊन मंगळवारच्या लोकमतमध्ये या बद्दलचे वृत्त प्रसिध्द केले होते.