तेलंगणाप्रमाणे भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्याचा कायदा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:33 AM2019-09-09T00:33:57+5:302019-09-09T00:34:32+5:30
जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आज सर्वत्र बेरोजगारी वाढत आहे, सरकारी भरतीला मर्यादा असतात, त्यामुळे खासगी उद्योगात कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ४० पेक्षा अधिक कंपन्यांनी स्टॉल उभारले असून, त्यातून अनेकांना हक्काचा रोजगार मिळेल असा विश्वास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.
रविवारी येथील शाम लॉज समोरील अर्जुन खोतकर व्यापारी संकुलात शिवसेनेतर्फे नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोदावरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर अंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, संजय खोतकर, पंडित भुतेकर, संतोष मोहिते यांच्यासह अन्य शिवसैनिकांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना खोतकर म्हणाले की, जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोगारांना नोकरी मिळावी म्हणून यापूर्वीही आम्ही नोकरी मेळावा घेतला होता. त्यातील दोन जण तर उच्च पातळीवर नोकरी करत आहेत. याही मेळाव्यातून अनेकांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. या मेळाव्यात जालन्यासह, पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांची दालने उभारली आहेत. त्यांना पात्र आणि कुशल मनुष्यबळाची मोठी गरज लक्षात घेऊन आपण त्यांना जालन्यात निमंत्रित केले आहे. भविष्यात ज्या प्रमाणे तेलंगणामध्ये ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणारा कायदा केला आहे, त्या पार्श्वभूमिवर आपल्या महाराष्ट्रात तसा कायदा करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भास्कर अंबेकर यांनीही विचार मांडले. ते म्हणाले की, आज नोकऱ्या नसल्याने अनेकजण बेरोजगार आहेत.
त्यामुळे हा महोत्सव म्हणजे युवकांसाठी मोठी संधी आहे. मी आणि खोतकरांनी देखील महाविद्यालयीन जीवनात असतांना पोलिस दलात अधिकारी होण्यासाठी प्रयत्न केले होते. असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत नवगिरे यांनी केले.
एक हजार जणांना संधी
रविवारी पार पडलेल्या नोकरी मेळाव्यात विविध राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच बँक, एलआयसी यासह अन्य कंपन्यांचे स्टॉल येथे लावले होते.
यावेळी दोन हजारपेक्षा अधिक बेरोजगारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी जवळपास एक हजार बेरोजगारांना नोकरीची हमी मिळाल्याची माहिती संयोजकांनी दिली.