टेंभुर्णीचा पाणीप्रश्न सुटेना...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:17 AM2018-10-03T00:17:32+5:302018-10-03T00:17:47+5:30
पाणीप्रश्न हा जणू काही टेंभुर्णीकरांच्या पाचवीलाच पुजलेला. मागील कित्येक वर्षांपासून टेंभुर्णीच्या पाणीप्रश्न सुटता सुटेना
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : पाणीप्रश्न हा जणू काही टेंभुर्णीकरांच्या पाचवीलाच पुजलेला. मागील कित्येक वर्षांपासून टेंभुर्णीच्या पाणीप्रश्न सुटता सुटेना. त्यामुळे पावसाळ्यातही टेंभुर्णीकरांचे पाण्यासाठी हाल सुरु आहे. नळाच्या पाण्यासाठी कोणत्याही ऋतूत टेंभुर्णीकरांना पंधरा दिवसांपेक्षा जास्तच दिवस वाट पाहावी लागत असल्याने नागरिकांत संतापाची लाट आहे. दरम्यान त्यात भर म्हणून सद्य:स्थितीत लोडशेडिंग वाढल्याने नागरिकांना मागील एक महिन्यापासून निर्जळीचा सामना करावा लागत आहे.
पंधरा हजार लोकसंख्येच्या टेंभुर्णी गावात भारत निर्माणसह पाणीपुरवठ्याची आणखी एक योजना पूर्ण झालेली असली तरी या सर्व योजना गावकऱ्यांना वेळेवर पाणी पाजण्यासाठी कुचकामी ठरल्या आहेत. कधी पाईपलाईनची गळती, कधी विजेचा प्रश्न तर कधी पाण्याची कमतरता या ना त्या कारणाने गावक-यांना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. पाण्याचे २१ झोन असलेल्या या गावात झोनमधील नागरिकांना कोणत्याही ऋतूत पंधरा दिवसांच्या आत दुसरयांदा पाणी मिळालेले नाही. अशा वेळी पंधरा दिवस पाणी साठवता येईल अशी व्यवस्था सामान्य नागरिकाकडे नसल्याने अनेकांना पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. नसता महिन्याला पाचशे रुपयांपर्यंत विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. लोडशेडिंगचे कारण दाखवीत सध्या गावात एक महिन्यापासून पाणी नाही. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थात चीड आहे.
नागरिकांची गैरसोय बघता याकडे लोकप्रतिनिंधीनी गांभीर्याने लक्ष देऊन गावातील पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कुंभारपिंपळगावत हातपंप बंद, ग्रामस्थांची भटकंती
कुंभार पिंपळगाव : कुं.पिंपळगावात काही भागातील हातपंप नादुरुस्त असल्याने या भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे परिसरात दोन महिन्यापासून पावसाने दडी दिल्याने गावातील पाणी पुरवठा योजनेवरही परिणाम झाला आहे. त्यातच गावातील बहुतांश हातपंप बंद असल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लाग आहे. याकडे ग्रा.पं. चे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकात संताप आहे.