विद्युत धक्क्याने दहा शेळ्यांचा मृत्यू; महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पशुपालकावर संकट

By विजय मुंडे  | Published: June 27, 2023 07:37 PM2023-06-27T19:37:31+5:302023-06-27T19:38:03+5:30

जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अचानक वीज प्रवाह आला आणि विद्युत धक्का लागल्याने दहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.

Ten goats killed by electric shock; Due to the carelessness of the Mahavitran, distress to the cattle rearer | विद्युत धक्क्याने दहा शेळ्यांचा मृत्यू; महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पशुपालकावर संकट

विद्युत धक्क्याने दहा शेळ्यांचा मृत्यू; महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पशुपालकावर संकट

googlenewsNext

बदनापूर : महावितरणच्या अधिकाऱ्यासह गुत्तेदाराने निष्काळजीपणा करीत गावठाण डीपीचे काम वेळेत केले नाही. परिणामी या कामामुळे जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने विद्युत धक्का लागून दहा शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी दावलवाडी (ता. बदनापूर) शिवारात घडली. या घटनेमुळे संबंधित पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथे एका गावठाण डीपीचे काम सुरू आहे. याकरिता विद्युत खांब उभा करण्यात आले आहेत व तारा जमिनीवर पडलेल्या आहेत. गावातील शिवाजी विठ्ठल गायकवाड यांच्या दहा बकऱ्या मंगळवारी सकाळी गावातच चरत होत्या. त्यावेळी जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अचानक वीज प्रवाह आला आणि विद्युत धक्का लागल्याने दहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. गायकवाड हे भूमिहीन असून, शेळी पालनावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

परंतु अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गायकवाड व ग्रामस्थांनी बदनापूर पोलिस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दिली आहे. त्यामध्ये वीज वितरण कंपनी व संबंधित गुत्तेदाराचे निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याबाबत सेलगाव येथील वीज वितरणचे अभियंता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर नंतर बोलतो असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली.

तत्काळ नुकसान भरपाई द्या
ग्रामपंचायत सदस्य गणेश जगताप म्हणाले, महावितरण व संबंधित गुत्तेदाराचे निष्काळजीपणामुळे एका भूमिहीन पशुपालकाचे दहा शेळ्या दगावल्या असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गावठाण डीपीचे काम लवकर करण्यासाठी संबंधितांकडे आम्ही अनेकवेळा पाठपुरावा केला. परंतु हे काम लवकर झाले नाही आणि ही घटना घडली. आता महावितरणने तातडीने गायकवाड यांना नुकसान भरपाई द्यावी.

Web Title: Ten goats killed by electric shock; Due to the carelessness of the Mahavitran, distress to the cattle rearer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.