ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर; प्रशासकीय दुर्लक्ष, अपुऱ्या निधीने बारव संवर्धन कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 04:21 PM2023-03-02T16:21:55+5:302023-03-02T16:22:19+5:30
संवर्धनासाठी प्राप्त निधी अपुरा; लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे
- अशोक डोरले
अंबड : शहराच्या विविध भागात होळकरकालीन दहा ऐतिहासिक बारव असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे या बारव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही इतिहासप्रेमींनी बारव संवर्धनासाठी मोहीम राबविल्यानंतर शासनाने निधी उपलब्ध करून दिला. परंतु, दिलेला निधीही अपुरा असून, बारव संवर्धनासाठी अधिक निधीची आवश्यकता आहे.
अंबड शहराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला असून, २५० वर्षानंतरही मंदिर व बारवेच्या इतिहासातील पाऊलखुणा शहरात आढळतात. शहरातील सर्वात मोठी बारव म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील पुष्कर्णी बारवेकडे पाहिले जाते. या बारवेत महादेव मंदिर असून, चारही बाजूंनी बारवेत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. आतमध्ये चार घाट तसेच देवकोष्टक आहे. अंबड ते डोंगरातील महादेव रस्त्याच्या शेजारी असलेल्या तांबोळी यांच्या मळ्यात चिचंबारव आहे. पूर्वी या परिसरात चिचेंचे बन आणि पानमळा असल्याने बारवेस चिचंबारव, चिचंविहीर असे म्हटले गेले. डोंगरातील महादेव मंदिराच्या पायथ्याशी शिवलिंग आकाराची बारव असून, या बारवेत उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच पशुपक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी या बारवेची निर्मिती केली होती. या बारवेचा गतवर्षी जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
होळकर नगरमध्ये राणीच्या वेशीजवळ नागोबा बारव असून, पूर्वी या बारवेत उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. मात्र नागरिकांनी बारवेच्या पायऱ्या बुजवून चौकोनी हौदाच्या आकारासारखा आकार या बारवेचा केला आहे. शहरातील एकमेव व सुरक्षित असलेली बारव म्हणजे कावंदी बारव आहे. व्यंकटेश गार्डनच्या पाठीमागे तीन वेगवेगळ्या बारव असून, या बारवांना मोतीबाग बारव म्हणतात. तीनपैकी दोन बारवांचा उपयोग श्री. बालाजी देवस्थान योग्य रितीने घेत असून, तिसरी बारव बुजवण्याच्या मार्गावर आहे. बियाबानी दर्गा परिसरात सासू-सुनेची बारव आहे. डोंगरावर गैबीनाथ-गहीनीनाथ पीर असून हिंदू-मुस्लीम लोक येथे दर्शनासाठी जातात. या भागातील बारवेचे दगड काढण्यात आले आहेत. श्री मत्स्योदरी देवीच्या पूजेअर्चेसाठी अहिल्यादेवी होळकर यांनी पुष्पवाटिका निर्माण केली होती. या पुष्पवाटिकेतील फुलांच्या झाडांना पाणी देण्यासाठी तसेच देवीच्या स्थानासाठी शिवलिंग आकाराची दगडी बारव निर्माण केली होती. या बारवेचा आजही पुष्पवाटिकेसाठी वापर केला जातो.
महाद्वारी बारवेची अवस्था बिकट
शहरातील भाजीमंडी परिसरात महाद्वारी नावाने बारव निर्माण केलेली आहे. सध्या बारवेच्या परिसरात झाडे उगवली असून, काहींचा बारव बुजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिक करीत आहेत. या बारवेत आजही पाणी असून केवळ आजूबाजूला उगवलेली झाडेझुडपे दूर करून कचरा काढल्यास बारव स्वच्छ होईल. बारवेला बारमाही पाणी राहत असल्याने या बारवेचा उपयोग पोहण्यासाठी केला जातो.
दुरुस्ती प्रस्ताव तयार आहेत
अंबड शहरातील बारवांच्या संवर्धनासाठी शासनाकडून काही निधी मंजूर झालेला असून, या अंतर्गत बारव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. काही बारवांची साफसफाई सुरू केली आहे. काही बारव दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. लवकरच त्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. या कामी गरजेनुसार लोकसहभागही घेतला जाणार आहे.
- विक्रम मांडुरके, मुख्याधिकारी अंबड