जालना जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड प्रकरणात दहा जणांना घेतले ताब्यात
By दिपक ढोले | Published: November 22, 2023 12:04 PM2023-11-22T12:04:53+5:302023-11-22T12:07:53+5:30
हुल्लडबाजांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धुडगूस घालत गाड्यांची तोडफोड केली.
जालना : गेल्या ७५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. मंगळवारी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा शांततेत निघाला. परंतु, मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची भाषणे झाल्यानंतर निवेदन स्वीकारण्यास अधिकारी आंदोलनस्थळी न आल्याने हुल्लडबाजांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धुडगूस घालत गाड्यांची तोडफोड केली. यामुळे मार्चाला हिंसक वळण मिळाले.
या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यापैकी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले,अशी माहिती पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे. माहिती मिळताच, विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी धाव घेऊन आढावा घेतला. घटनास्थळाला पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी भेट देऊन पाहणी केली, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.