मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 06:48 AM2024-09-23T06:48:38+5:302024-09-23T06:49:21+5:30
पोलिसांची मध्यस्थी, बंदोबस्तात वाढ
वडीगोद्री (जि.जालना) : अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता बंद असल्याने सलग तिसऱ्या दिवशी (रविवारी) वडीगोद्री येथे तणावाची स्थिती कायम होती. काही युवकांनी घोषणाबाजी केल्याने ओबीसी आंदोलक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला. वडीगोद्रीतील ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन स्थळापासूनच अंतरवाली सराटी गावाकडे रस्ता जातो. रविवारी दुपारी एक चारचाकी वाहन अंतरवाली सराटीकडून वडीगोद्री उपोषण स्थळासमोरून गेले. त्यावेळी वाहनातील युवकांनी घोषणाबाजी केल्याने ओबीसी आंदोलक संतापले. नंतर ओबीसी आंदोलक शांत झाले.
सहनशक्ती संपली तर...:
जरांगे पाटील मी रोज मराठा समाजाला शांततेचे आवाहन करतोय. भुजबळ यांनी लावलेली नाटक कंपनी आहे तिथे. मराठ्यांवर अन्याय होतोय. समाजाची सहनशक्ती संपली तर खेळ खल्लास, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
'दुसऱ्याचं ते कारटं' बंद करा : लक्ष्मण हाके आता आपला बाबा आणि दुसऱ्याचं कारटं हे बंद करावे. तुम्ही संभाजीराजे व उदयनराजे यांच्याबद्दल खासगीमध्ये काय बोलता हे महाराष्ट्रासमोर आणण्याची वेळ आणू नका, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.
मराठा शिष्टमंडळाबरोबर आज मुख्यमंत्र्यांची बैठक
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, यासाठी पुण्यातील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
या भेटीत मराठा आरक्षणाबाबत सरकारने ठोस घोषणा करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, हैदराबात संस्थानचे गॅझेट लागू करावे याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
मनोज जरांगे यांचे उपोषण मागे घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. यासंदर्भात सोमवारी मुंबईत सविस्तर बैठक होणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.