दहावा संशयित रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:27 PM2020-03-21T23:27:17+5:302020-03-21T23:27:34+5:30
जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी दुपारी दहावा कोरोना संशयित रूग्ण उपचारासाठी दाखल झाला आहे.
जालना : जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात शनिवारी दुपारी दहावा कोरोना संशयित रूग्ण उपचारासाठी दाखल झाला आहे. तर शुक्रवारी दाखल झालेल्या सहा रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, नेपाळ येथून आलेल्या ३० जणांना त्यांच्या घरातच निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पाहता जालना जिल्ह्यातून इतर शहरासह इतर राज्य, विदेशातून परत येणाऱ्या नागरिकांना दक्षतेचा उपाय म्हणून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. त्या शारीरिक त्रास असलेल्या रूग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. जालना जिल्हा रूग्णालयात शनिवारी २१ मार्च रोजी दुपारपर्यंत १० जणांना कोरोना विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी दाखल तिघांच्या स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी सहा जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. संबंधितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. शनिवारी दुपारी दहावा कोरोना संशयित रूग्ण विलगीकरण कक्षात दाखल झाला आहे. त्याचेही स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांनी दिली.