TET Exam Racket : पुणे गुन्हे शाखेचा जालना जिल्ह्यात तपास, व्हायरल ऑडिओ क्लिपवरून वाटूरला छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 02:07 PM2021-12-18T14:07:58+5:302021-12-18T14:08:38+5:30
TET Exam Racket :टीईटी पेपर फुटी प्रकरणाची माहिती देताना एजंटने सांगितलेल्या नावावरून जालना जिल्ह्यात तपास
जालना : राज्यात गाजत असलेल्या टीईटी पेपर ( TET Exam Racket ) फुटी प्रकरणी एका एजंटची व्हायरल झालेल्या एका ऑडीओ क्लिपवरून पुणे गुन्हे शाखेच्या ( Pune Crime Branch ) एका पथकाने जालना जिल्ह्यात आज सकाळपासून छापासत्र सुरु केले आहे. गुन्हे शाखेचे एक पथक वाटूर येथे ऑडिओ क्लिपमध्ये नाव आलेले प्रा. सुनील कायंदे यांच्या घरी तपास करत आहे. तसेच एक पथक शहरात देखील तपास करत असल्याची माहिती आहे.
आरोग्य विभाग तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या (म्हाडा) ( MHADA Paper leak ) भरती परीक्षेतील पेपरफुटी उजेडात आल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने आता शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) पेपरफुटी ( TET Exam Racket) उघडकीस आणली आहे. जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा महाराष्ट्र संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याला म्हाडा पेपरफुटी प्रकरणात अटक केल्यावर त्याची घरझडती घेण्यात आली. त्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील हॉल तिकिटे तसेच उमेदवारांची नावे असलेली यादी सापडली होती.
यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे याच्यासह तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही याप्रकरणी अटक झाली आहे. यानंतर एका वृत्तवाहिनीने पेपर फुटी प्रकरणाची माहिती एक एजंट देत असल्याची ऑडीओ क्लीप ऐकवली. यात एजंटने टीईटी पेपरमध्ये कशाप्रकारे पैसे घेऊन पास करण्यात येते हे सांगितले. दरम्यान या एजंटने जालना जिल्ह्यातील प्रा. सुनील कायंदे यांचे नाव घेत त्यांनी टीईटी पास होण्यासाठी पैसे दिल्याचे सांगितले. यावरून पुणे येथील गुन्हे शाखेच्या एका पथकाने आज वाटूर येथील प्रा. कायंदे यांच्या घरी छापा टाकला आहे. तसेच गुन्हे शाखेचे एक पथक जालना शहरातील शकुंतला नगर परिसरात देखील तपास करत असल्याची माहिती आहे.
आरोपात तथ्य नाही
मुलावर केलेले आरोप बिन बुडाचे आहेत. हमाझा मुलगा एक चांगला शिक्षक आहे. त्याने काही गैरकृत्य केलेले नाही.
- अर्जुन कायंदे, वाटुर
हेही वाचा - TET Exam Racket: 'पात्र शिक्षक' होण्यासाठी द्यावे लागत होते दीड ते तीन लाख !